इतिहासात दुसऱ्यांदा रेल्वेची धडधड थांबली, कशी? ते वाचलेच पाहिजे

प्रमोद चौधरी
गुरुवार, 2 एप्रिल 2020

पुढील आदेश येईपर्यंत भारतातील रेल्वे सेवा बंद राहणार आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर कायम असणारी प्रवासी वर्दळ, रेल्वेगाड्यांची झुकझुक, इंजिनची शिटी बंद झाली आहे. देशभरातील सात हजार स्थानकांवरील तिकीट खिडक्यांनाही कुलुप लागले आहे.

नांदेड :  भारताची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या भारतीय रेल्वेची प्रवासी सेवा कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २२ मार्चपासून पूर्णपणे थांबवण्यात आलेली आहे. १९७४च्या कर्मचारी संपानंतर रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प होण्याची ही दुसरी वेळ. 

इंजिनची शिट्टी झाली बंद
१६७ वर्षांचा इतिहास असलेल्या भारतीय रेल्वेत संपाचा अपवाद वगळता असे प्रथमच घडत आहे. पुढील आदेश येईपर्यंत रेल्वे सेवा बंद राहणार आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर कायम असणारी प्रवासी वर्दळ, रेल्वेगाड्यांची झुकझुक, इंजिनची शिटी बंद झाली आहे. देशभरातील सात हजार स्थानकांवरील तिकीट खिडक्यांनाही कुलुप लागले आहे.

हेही वाचा स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेकडून एक कोटीची मदत

असा आहे रेल्वेचा इतिहास
१६ एप्रिल १८५३ मध्ये मुंबई ते ठाणे दरम्यान भारतात पहिली रेल्वे धावली. तेव्हापासून भारतीय लोकांच्या जीवनातील अविभाज्य भाग असलेली रेल्वे अनेक संकटावर मात करत अखंडितपणे धावत आहे. इतिहासावर नजर टाकल्यास सात ते २८ मे १९७४ मध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संपामुळे २० दिवस प्रथमच रेल्वे सेवा ठप्प होती. कामाचे तास कमी करा, बोनस वाढवा आदी मागण्यासाठी आॅल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशनचे तत्कालिन अध्यक्ष दिवंगत जाॅर्ज फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली पुकारण्यात आलेल्या संपामुळे संपूर्ण भारतातील रेल्वे सेवा प्रथमच जवळजवळ ठप्प झाली होती. त्यानंतर ४६ वर्षांनी दुसऱ्यांदा गाड्यांची धडधड पूर्णपणे ठप्प झाली आहे.

हे देखील वाचाच सहा हजार गावकऱ्यांच्या आरोग्यासाठी ग्रामपंचायतीचा पुढाकार

भारतीय रेल्वेवर दृष्टीक्षेप

 • सात हजार रेल्वे
 • स्थानके, आरक्षण, तिकीट बंद
 • सुरुवात १६ एप्रिल १८५३
 • एकूण क्षेत्रफळ ६८ हजार किमी
 • एकूण विभाग - १६ झोन
 • प्रवासी गाड्या - आठ हजार ७००
 • मालगाडी - सात हजार
 • इंजिन - सात हजार ७३९
 • रेल्वे स्टेशन - सात हजार
 • प्रवासी वाहतूक - दोन कोटी दररोज
 • कर्मचारी संख्या १५ लाख 

मालवाहतूक सेवा सुरळीत
नांदेड विभागातून देशातील प्रत्येक ठिकाणी जाण्याकरिता रेल्वे गाड्या दररोज धावतात. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नांदेड विभागातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील रेल्वे बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे प्रवासी वाहतुक सेवा पुढील आदेशापर्यंत बंद आहे. मालवाहतूक सेवा मात्र सुरु ठेवण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Second Time in History, Railway Tracks Have Stopped Nanded News