सेलू : पोलिसांनी पकडलेल्या तांदळाचे गौडबंगाल

संजय मुंडे
Sunday, 18 October 2020

मात्र या याबत अद्यापही उलगडा झाला नसल्याने यात काही 'गौडबंगाल' तर नाही ना असी शंका नागरिकांतून उपस्थित होत आहे. 

सेलू (जिल्हा परभणी) : सेलू तालुक्यातील वालूर- मोरेगाव रस्त्यावर असलेल्या हातनुर गावाच्या शिवारात गुरुवारी (ता. १५) रात्री दहाच्या सुमारास सेलू पोलिसांनी आयशर वाहनातून सहाटन तांदूळ पकडून तीन दिवस झाले. मात्र या याबत अद्यापही उलगडा झाला नसल्याने यात काही 'गौडबंगाल' तर नाही ना असी शंका नागरिकांतून उपस्थित होत आहे. 

जिंतूर विभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली सेलू पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय रामोड, पोलिस उपनिरीक्षक संतोष माळगे, पोलिस नाईक रामेश्वर मुंढे, बाळू पुरणवाड, चालक अशोक रसाळ यांना गुरुवारी रात्री वालूर- मोरेगाव रस्त्यावर हातनुर गावाच्या शिवारात मंठा (जि. जालना) शहराच्या दिशेने जात असलेला आयशर टेम्पो ( एम.एच.१५ जि.के.५३५५) पोलिसांनी अडविला. त्या टेम्पोची तपासणी केली असता टेम्पोमध्ये सहा टन तांदूळ आढळून आला. 

हेही वाचासहा महिण्यानंतर राज्यातील ग्रंथालये वाचकांसाठी उघडली

तीन दिवसानंतरही अहवाल नाही

पोलिस पथकाने टेम्पो व त्यातील असलेल्या तांदळाची चौकशी केली असता पोलिसांना संशय आल्याने तात्काळ  मुद्देमालासह वाहन सेलू पोलिस ठाण्यात लावले. दरम्यान पोलिसांनी जप्त केलेल्या तांदूळाविषयी तहसील प्रशासनाला पत्राद्वारे कळवले. परंतु तीन दिवस उलटूनही तांदूळाची चौकशी केली गेली नाही. पोलिसांनी जप्त केलेल्या तांदळसह या वाहनांच्या चौकशीच्या गौडबंगालाविषयी नागरिकांत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आयशर टेम्पोचा चालक रमेश खाडे व शेख बाबू शेख सलीम यांनी हा तांदूळ वालूर (ता. सेलू) गावातून ज्यांच्याकडून घेतला त्यांची नावे पोलिसांना दिलेल्या जवाबात दिली आहेत. मात्र महसूल विभागाच्या वतीने तांदळाचा नमुना अहवाल स्पष्ट झाल्यानंतरच या बाबत कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय रामोड यांनी सांगितले. 

येथे क्लिक कराकार्यकर्त्यांनी समाज शरण वृत्तीने कार्य करावे- डॉ. विजय लाड -

तहसिलदार नॉट रिचेबल 

पोलिसांनी तांदूळ व वाहन ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात लाऊन तीन दिवस झाले असले तरी तहसील प्रशासनाकडून  अद्यापही या बाबत चौकशी केली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तहसीलदार बालाजी शेवाळे यांच्याशी संपर्क साधून याबत माहिती घेण्यासाठी रविवारी (ता. १८) प्रयत्न केला. परंतु  संपर्क न झाल्याने माहिती मिळाली नाही. 

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Selu: rice seized by police parbhani news