लातूरसाठी ऑगस्टपेक्षा सप्टेंबर ठरतोय धोकादायक, वीस दिवसांत सहा हजार २७७ जण कोरोनाबाधित

हरी तुगावकर
Tuesday, 22 September 2020


लातूरसह जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या काही दिवसांपासून वाढत आहे.

लातूर : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या काही दिवसांपासून वाढत आहे. ऑगस्टपेक्षा सप्टेंबर लातूरसाठी धोकादायक ठरताना दिसत आहे. ऑगस्ट महिन्यात पाच हजार ९१२ जणांना कोरोनाची लागण झाली होती; पण सप्टेंबरमध्ये केवळ वीस दिवसांत सहा हजार २७७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा १४ हजार ३८९ च्या घरात गेला आहे.

याला शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील नागरिकांचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरताना दिसून येत आहे. लातूर मार्चपासून ते जुलैपर्यंत बऱ्यापैकी सुरक्षित होते; पण त्यानंतर मात्र कोरोनाबाधितांची संख्या लक्षणीय वाढताना दिसून येत आहे. जिल्ह्यात मार्चमध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण नव्हता. एप्रिलमध्ये केवळ १६ जणांना लागण झाली होती. मेमध्ये ११९ कोरोनाचे रुग्ण सापडले. जूनमध्ये २१४ जण कोरोनाने बाधित झाले.

रस्ता चांगला की खराब? कळणार एका क्लिकवर, लातूर जिल्ह्यासाठी खास सॉफ्टवेअर  

जुलैमध्ये अनलॉक सुरू झाला आणि कोरोनाबाधितांची संख्या वाढत गेली. जुलैमध्ये एक हजार ८५१ जण कोरोनाने बाधित झाले होते. ऑगस्टमध्ये तर कोरोनाने कहर केला. जिल्ह्यात लॉकडाउन असतानासुद्धा रोज दीडशे - दोनशे रुग्ण आढळून येत होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये पाहता पाहता पाच हजार ९१२ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यात सप्टेंबरमध्ये तर कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. अवघ्या वीस दिवसात सहा हजार २७७ जणांना कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे.

रोज तीनशेपेक्षा अधिक नागरिकांना कोरोनाची लागण होताना दिसत आहे. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या पाहता पाहता १४ हजार ३८९ वर गेली आहे. काही दिवसांपासून अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे शाळा, चित्रपटगृह वगळता सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. सर्व बाजारपेठ सुरळीत सुरू झाली आहे. गर्दीही होऊ लागली आहे. असे असतानासुद्धा अनेक नागरिक मास्कचा वापर न करता, शारीरिक अंतराच्या नियमाचे पालन न करताच फिरताना दिसत आहेत. नागरिकांनी शासनाने सांगितलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली तर कोरोनावर मात करणे शक्य आहे.

लातूर जिल्ह्यातील १४२ प्रकल्पांत केवळ २७ टक्के जलसाठा, दमदार पावसाची प्रतिक्षा

कोरोनाबाधितांचे आकडे
एप्रिल---१६
मे-----११९
जून-----२१४
जुलै----१८५१
ऑगस्ट----५९१२
सप्टेंबर (ता. २० पर्यंत)---६२७७

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: September Dangerous Than August For Latur