मोदींची ‘ऑफर’ नाकारली!

Sharad-and-Narendra
Sharad-and-Narendra

मुंबई - ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकत्रित काम करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, मी तो नाकारला,’’ असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केला.

पवार यांनी एका खासगी दूरचित्रवाणी वाहिनीला मुलाखत दिली. त्यात सत्तास्थापनेच्या सर्व नाट्यमय घडामोडींची पहिल्यांदाच जाहीरपणे उकल केली. या वेळी सत्ता स्थापन करतानाची कसरत, अजित पवार यांचे बंड, उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद, यासोबतच अमित शहा यांचे राजकीय डावपेच व देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतचा राजकीय समज, यावर भाष्य केले.

पवार म्हणाले, ‘मोदींनी सोबत काम करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, ‘आपले व्यक्तिगत संबंध चांगले आहेत आणि राहतील. पण, तुमच्याबरोबर काम करणे मला शक्‍य नाही,’ असे मी त्यांना सांगितले.’’ मोदी सरकारने मला राष्ट्रपतिपदाची ऑफर दिल्याच्या वृत्ताचाही पवार यांनी इन्कार केला. मात्र, केंद्रीय मंत्रिमंडळात सुप्रिया सुळे यांना मंत्रिपदाची ऑफर होती, असे ते म्हणाले.

महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी आणि शेतीच्या नुकसानीसंदर्भात चर्चा करण्यासाठी पवार यांनी दिल्लीत जाऊन मोदी यांची भेट घेतली होती. अतिवृष्टीसंदर्भात बोलणे झाल्यानंतर पंतप्रधानांनी एकत्रित काम करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु, तो पवारांनी नाकारला.

‘विकासाच्या संदर्भात, उद्योगाच्या संदर्भात, शेतीबद्दल आपली मतं, भूमिका वेगळी नाही; मग मतभिन्नता कुठेय?’’ असा प्रश्न मोदी यांनी विचारला. त्यावर, ‘‘एकत्रित येण्याचा तुमचा आग्रह मी स्वीकारू शकत नाही. मी एक लहानसा पक्ष चालवतो. पक्षातील नेत्यांना मी जी दिशा दिली आहे, ती आता बदलणे शक्‍य नाही,’’ असे उत्तर पवार यांनी दिले.

फडणवीसांना सत्तेचा दर्प
‘माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्यात व वागण्यात सत्तेचा दर्प दिसत होता. त्यांच्या राजकारणात ‘मी’पणा आलेला होता. मी म्हणजेज महाराष्ट्र. मी म्हणजेच सर्वकाही. बाकी सगळे तुच्छ, अशी त्यांची धारणा झाल्याचे जाणवत होते,’’ असे पवार म्हणाले.

‘मी पुन्हा येईन... या त्यांच्या वाक्‍यातच ‘मी’पणाचा दर्प होता. शिवाय, आता महाराष्ट्रातून शरद पवार यांचे राजकारण संपले. आता माझा काळ सुरू झाला आहे, अशा शब्दांत फडणवीस यांनी प्रचार केला. त्याचा विपरीत परिणाम मतदानात झाला. भाजपला ज्या १०५ जागा मिळाल्या, त्या केवळ नरेंद्र मोदी यांच्याबाबत जनमानसातल्या भावनेमुळे मिळाल्या. फडणवीस यांच्यामुळे त्या मिळाल्या नाहीत,’’ अशा शब्दांत पवार यांनी फडणवीस यांचा समाचार घेतला. त्यातच महाराष्ट्राच्या जडणघडणीत फडणवीस यांचे फार योगदान कुठेय, असा सवालही पवार यांनी केला.

सामान्य जनतेला असा ‘मी’पणाचा दर्प आवडत नसतो. त्यामुळेच, भाजपला समाधानकारक यश मिळाले नाही, असे सांगताना दिल्लीतील भाजपच्या गोटातही फडणवीस यांच्याबद्दल नाराजीचा सूर असल्याचा गौप्यस्फोट पवार यांनी या वेळी केला.

शहांबद्दल सावधगिरी 
‘शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेससोबत सत्ता स्थापन करताना मला नरेंद्र मोदी यांची भीती नव्हती. पण, अमित शहा यांच्याबाबत मात्र मी सावधगिरी बाळगली होती. कोणत्याही स्थितीत अमित शहा महाराष्ट्र हातचा जाऊ देणार नाहीत, याची खात्री होती. म्हणून जिथे आक्रमक तिथे आक्रमक व जिथे बुद्धीने काम करायचे होते तिथे त्याप्रमाणे काम केल्यामुळेच आम्ही महाराष्ट्रात सत्ता स्थापन करू शकलो,’’ असे पवार म्हणाले.

सोनियांना समजावले
महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेना-भाजप युतीला बहुमताचा कौल दिला होता. पण, शिवसेनेची अस्वस्थता पाहून मी काँग्रेससोबत चर्चा करण्याचा निर्णय घेतला अन्‌ सत्तास्थापनेचा नवा डाव सुरू झाल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. या वेळी काँग्रेसचे मन वळवताना अध्यक्षा सोनिया गांधी यांना शिवसेनेची आजपर्यंतची भाजपविरोधी भूमिका समजावून सांगितल्याचे पवार म्हणाले. आणीबाणीच्या वेळी बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधींना दिलेला पाठिंबा, राष्ट्रपती निवडणुकीत प्रतिभा पाटील व प्रणव मुखर्जी यांना दिलेले समर्थन. भाजपसोबत केंद्रात असूनही पाच वर्षे यूपीएच्या सोबत घेतलेल्या भूमिका, याबाबत सोनिया गांधी यांना समजावून सांगितल्यानंतर त्या राजी झाल्याचे पवार यांनी सांगितले.

उद्धव तयार नव्हते
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होण्यासाठी अजिबात तयार नव्हते. शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवेन, असा बाळासाहेबांना शब्द दिल्याचे ते सतत सांगत होते. त्यामुळे मी स्वत: नको, अशी त्यांची धारणा होती. मात्र, मी स्वत: त्यांची समजूत काढली. अखेर त्यांना मी त्यांच्याच भाषेत ‘हा माझा आदेश आहे,’ असे सांगितले. त्यांनी माझ्या शब्दाला मान दिला व मुख्यमंत्रिपद स्वीकारले, हे पवार यांनी या वेळी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com