वाहनांची खरेदी सत्तर टक्‍यांनी घसरली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद - नोटाबंदी निर्णयाचा फटका इतर क्षेत्रांप्रमाणेच वाहनविक्रीलादेखील बसला आहे. त्यामुळे रोख वाहनविक्री तर पूर्णपणे ठप्पच झाली आहे; मात्र डाऊन पेमेंट करण्यासाठीदेखील रोख पैसे उपलब्ध होत नसल्याने वाहनखरेदी 70 टक्‍क्‍यांनी घटली आहे.

औरंगाबाद - नोटाबंदी निर्णयाचा फटका इतर क्षेत्रांप्रमाणेच वाहनविक्रीलादेखील बसला आहे. त्यामुळे रोख वाहनविक्री तर पूर्णपणे ठप्पच झाली आहे; मात्र डाऊन पेमेंट करण्यासाठीदेखील रोख पैसे उपलब्ध होत नसल्याने वाहनखरेदी 70 टक्‍क्‍यांनी घटली आहे.

केंद्र शासनाने पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातली. अचानकपणे ही बंदी आल्यामुळे विविध व्यवसायांवर विपरीत परिणाम झाला तसा तो वाहनविक्रीवरही झाला. या क्षेत्रातील जाणकार आणि परिवहन विभागाच्या माहितीनुसार 70 ते 75 टक्के घट सर्वच प्रकारच्या वाहनांच्या विक्रीत झाली आहे. नोटाबंदी जाहीर झाली, त्या दिवशी म्हणजे 8 नोव्हेंबर रोजी परिवहन कार्यालयात तीस कारची नोंदणी झाली होती. नोटाबंदी घोषणेच्या दुसऱ्याच दिवशी वाहनाच्या नोंदणीवर परिणाम झाला. 9 रोजी केवळ बारा, 11 रोजी नऊ, 15 रोजी वीस तर 18 रोजी सोळा कारची नोंदणी झाली. चारचाकीप्रमाणेच दुचाकी व अन्य वाहनांच्या विक्रीतही घट झाली आहे. नागरिकांना नव्या नोटा उपलब्ध होत नाहीयत व जुन्या नोटा स्वीकारल्या जात नाहीयत. त्यामुळे डाऊन पेमेंट करण्याचीदेखील सोय राहिली नाही.

मालवाहतूकही मंदावली
परिवहन विभागाच्या माहितीनुसार नोटाबंदीमुळे लांब पल्ल्याच्या मालवाहतुकीवर 8 ते 10 नोव्हेंबर दरम्यान 80 टक्के परिणाम झाला. नोटाबंदीच्या पंधरा दिवसांनंतर परिस्थिती बदलत असली तरी अद्याप मालवाहतूक निम्म्यावरच आहे. मालवाहतुकीची आगाऊ बुकिंग 30 ते 50 टक्के घसरली आहे. शहरातून बाहेरगावी होणाऱ्या मालवाहतुकीत तीस टक्‍क्‍यांनी, तर राज्य परिवहन मंडळाच्या प्रवासी वाहतुकीत अकरा टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. ट्रॅव्हल्सच्या माध्यमाने होणाऱ्या प्रवासी वाहतुकीत तीस ते चाळीस टक्के घट झाली असून याशिवाय स्पेशल परमिट घेऊन प्रवासाला जाणाऱ्या सहली 90 टक्‍के रद्द झाल्या आहेत.

नोटाबंदीमुळे वाहनखरेदीवर परिणाम झाला आहे. पूर्वी नोंदणी होणाऱ्या वाहनांच्या तुलनेत सत्तर टक्‍के विक्री घटल्याने कराच्या रूपाने मिळणाऱ्या महसुलावरदेखील परिणाम झाला आहे. यासंदर्भात परिवहन आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे.
किरण मोरे, सहायक परिवहन अधिकारी

Web Title: Seventy per cent decline to purchase vehicles