कोरोना रुग्णांना चांगल्या सेवा द्या; 'रेमडेसिव्हिर'ची टंचाई भासणार नाही, यावर नियंत्रण ठेवा: पालकमंत्री शंकरराव गडाख  

MLA Shankarrao Gadakh
MLA Shankarrao Gadakh

उस्मानाबाद : जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी रोज सायंकाळी आढावा घ्यावा. यात येणाऱ्या अडचणी सोडवून रुग्णांना चांगल्या सेवा द्याव्यात, रेमडेसिव्हिर इंजेक्शनची टंचाई भासणार नाही. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करा, असे आदेश मृदा व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत दिले. या बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, पोलिस अधीक्षक राज तिलक रौशन, अप्पर जिल्हाधिकारी रूपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी.के. पाटील, डॉ. सचिन बोडके तर मंत्रालयातून पालकमंत्र्यांचे खासगी सचिव बप्पासाहेब थोरात, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हणमंत वडगावे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. मिटकरी आदी सहभागी झाले होते. 

कोरोनापासून लोकांचे जीव वाचविणे, त्यांची काळजी घेणे हीच सध्याच्या परिस्थितीत आपले प्राधान्य असले पाहिजे. यासाठी प्रत्येक रुग्णाला आवश्यक औषधोपचार मिळाला पाहिजे. औषधाची गरज असेल तर मी संबंधित विभागाच्या मंत्र्यांशी बोलून पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याची विनंती करतो. जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत आहे. परंतु, आणखी ऑक्सिजन सिलिंडरची गरज असेल तर मी अन्न व औषध विभागाचे मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांना विनंती करून जिल्ह्यास होणारा दोन दिवसाआडचा ऑक्सिजन पुरवठा दररोज करण्यास सांगेल, असे सांगून पुरेशी साधन सामग्री असलीच पाहिजे, याकडेही पालकमंत्र्यांनी लक्ष वेधले. ज्या नागरिकांच्या घरी होम आयसोलेशनची सोय आहे, अशांनाच त्यांच्या घरी जाऊ द्या. अन्यथा त्यांची कोरोना केंद्रात व्यवस्था करा. जिजामाता मुलींचे वसतीगृह येथे सुरू करण्यात आलेले कोरोना सुविधा केंद्र ही अतिशय उत्तम संकल्पना असून, हे केंद्र चोवीस तास सुरू करण्यात यावे, असेही आदेश त्यांनी यावेळी दिले. 

‘रेमडेसिव्हिरची चौकशी करा’ 
कोरोना चाचणीच्या संख्येत वाढ करावी, त्याच बरोबर जे रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत, त्यांच्या सान्निध्यात आलेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांच्याही कोरोना चाचण्या कराव्यात. जिल्ह्यात आरटीपीसीआर कोरोना चाचणीचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. यासाठी आवश्यक ती यंत्र सामग्री तत्काळ उपलब्ध करा, पुरेसा औषधसाठा करण्याबरोबरच रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या साठ्याबाबत तक्रारी येत असल्याने अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करा, अशा सूचनाही  पालकमंत्री श्री. गडाख यांनी दिली. 

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com