esakal | आंबेडकरवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांचे मुंडण, कशामुळे ते वाचा...
sakal

बोलून बातमी शोधा

mundan

राजगृहावर झालेल्या तोडफोडीचा निषेध करण्यासाठी भीम आर्मी संघटनेच्यावतीने परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडण आंदोलन कार्यकर्त्यांनी केले. तसेच विविध संघटनांकडून हल्लेखोरांवर कारवाईची मागणी करण्यात आली.  

आंबेडकरवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांचे मुंडण, कशामुळे ते वाचा...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परभणी ः राजगृहावरील तोडफोड करणाऱ्यांना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी भीम आर्मी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर बुधवारी (ता.आठ) मुंडण आंदोलन करून निषेध व्यक्त केला. दरम्यान, शहरातील विविध संघटनांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून कारवाईची मागणी केली. 

दादर (मुंबई) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृह या ठिकाणावर मंगळवारी (ता.सात) सायंकाळी पाचच्या सुमारास काही समाजकंटकांनी तोडफोड केली. या तोडफोडनंतर या घटनेचा संपूर्ण राज्यभरात निषेध केला जात आहे. राजगृह निवासस्थांनातील झाडांच्या कुंड्याची नासधूस करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ परभणी शहरातील आंबेडकरवादी संघटनांनी निदर्शने केली. भीम आर्मी भारत एकता मिशन संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. 

हेही वाचा -  दोन हजार २०० पोषण परसबागा साकारणार हा जिल्हा..

तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱी कार्यालयासमोर घटनेच्या निशेधार्थ मुंडन आंदोलन करून आपला राग व्यक्त केला. या आंदोलनाचे नेृतत्व जिल्हाप्रमुख कचरु गोडबोले यांनी केले. या वेळी मनोज कांबळे, किशोर शेवाळे, भंन्ते कश्यप थेरो आदी या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन पाठविले. निवेदनात तोडफोड करणाऱ्या समाजकंटकावर कारवाईची मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना रिपब्लिकन सेना, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन कामगार सेना, भीमप्रहार संघटना, राष्ट्रवादी कॉग्रेस परभणी विधानसभा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) यांच्यावतीने निषेधाचे निवेदन देण्यात आले. 

हेही वाचा -  लग्न लावा परंतू घरच्या घरीच...! कोण म्हणाले वाचा...

राजगृहावरील दगडफेकीचा सोनपेठमध्ये निषेध 
सोनपेठ ः मुंबई येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानावर करण्यात आलेल्या दगडफेकीचा सोनपेठ येथील आंबेडकर प्रेमींनी तीव्र निषेध व्यक्त केला. मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थान असलेल्या राजगृह येथे दोन अज्ञात व्यक्तींनी (ता.सात) तोडफोड करून नासधुस केली आहे. नुकसान करणाऱ्या गुन्हेगारांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोनपेठ येथे तहसीलदार डॉ. आशिषकुमार बिरादार तसेच सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सोमवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनावर हनुमान पंडित, रुस्तुम तुपसमीनदरे, शरद पांडागळे, सुशील सोनवणे, ईश्वर मुजमुले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 


सबंध आंबेडकरी जनतेच्या भावना तीव्र 
सदरील घटना ही संविधानद्रोही अज्ञात व्यक्तीने केल्यामुळे सबंध आंबेडकरी जनतेच्या भावना तीव्र झाल्या आहेत. या घटनेमागचा सुत्रधार कोण हे सरकारने शोधून काढावे. हा हल्ला आंबेडकरी चळवळ सहन करणार नाही. सरकारने तातडीने पावले उचलावीत अन्यथा आंबेडकरी जनतेचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. 
- विजय वाकोडे, राज्य उपाध्यक्ष, रिपब्लिकन सेना 

हा अस्मितेवर हल्ला आहे 
राजगृहावर झालेली तोडफोड ही आमच्या अस्मितेवर झालेला हल्ला आहे असे आम्ही समजतो. या घटनेची नैतिक जबबादारी स्विकारून मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा व अज्ञात हल्लेखोरांना तातडीने अटक करावी. 
- भत्ने कश्यप थेरो, परभणी