ती आधी लैंगिक संबंध बनवायची मग क्‍लिप तयार करुन ब्लॅकमेल करायची.

मनोज साखरे
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

उमेदवाराच्या मुलाकडूनही उकळली खंडणी 
 

औरंगाबाद - मॉलमध्ये फिरायचे, श्रीमंतांच्या मुलांना जाळ्यात ओढायचे. मैत्री नंतर लैंगिक संबंध करण्यास भाग पाडायचे व छुप्या कॅमेऱ्याद्वारे शुटींग करुन त्याची क्‍लिप करायची. याच क्‍लिपद्वारे ब्लॅकमेलींग करुन पैसे उकळायचे. असा भयानक फंडा वापरुन ती व तिच्या साथीदाराने विधानसभा निवडणुक लढवणाऱ्या उमेदवाराच्या मुलाला ब्लॅकमेल केले. यानंतर ब्लॅकमेलर तरुण व तरुणीनीच्या सांगण्यावरुन दोघांना तीन लाख रुपये घेताना पुंडलिकनगर पोलिसांनी गुरुवारी (ता. 24) अटक केली. मतदार संघात व्हिडीओ क्‍लिप व्हायरल करण्याची धमकी ती व तिचे साथीदार देत होते. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, एकवीस वर्षीय ऍना (नाव बदलले आहे.) व तिची टोळीच श्रीमंतांच्या मुलांना जाळ्यात ओढून स्वत: त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर त्याचे छुप्या कॅमेराने चित्रिकरण करायचे. त्यानंतर शारीरिक संबंधाची व्हिडीओ क्‍लिप व्हायरल करण्याची धमकी देत ऍना हिने अनेकांकडून पैसे उकळले. याबाबत एप्रिल 2019 मध्ये जवाहरनगर पोलिस ठाण्यात अनिकेत (नाव बदलले आहे.) या तरुणाने तक्रार देऊनही फारसा उपयोग झाला नाही. म्हणुन ऍना व तिचा साथीदार राजू साहणी यांची हिंमत वाढली होती. 

गजानन कॉलनीत राहणाऱ्या अनिकेतशी ऍनाची मैत्री जुळली. त्यानंतर दोन वर्षांपुर्वी त्याला शारीरिक संबंध ठेवण्यास तिने भाग पाडले. त्यावेळी हा प्रकार तिने छुप्या कॅमेऱ्यात कैद केला होता. त्याद्वारे तिने साथीदार राजू सहाणीच्या मदतीने अनिकेतला ब्लॅकमेलींग सुरू केली. व्हिडीओ क्‍लिप व्हायरल करण्याची धमकी दिल्याने वैवाहिक जीवनात त्रास होऊ नये. म्हणून अनिकेतने 24 एप्रिलला तिला व राजूला पाच लाख रुपयांची खंडणी दिली. तसेच यापुढे कोणताही संबंध राहणार नाही असा उल्लेखही शंभर रुपयांच्या मुद्रांकावर त्यांनी केला होता. 

मतदार संघात क्‍लिप व्हायरलची धमकी.... 
अनिकेत याचे वडिल एका पक्षाच्या तिकिटावर पैठण विधानसभा निवडणुक लढवित आहेत ही बाब ऍना व राजू सहाणीला माहिती होती. त्यांनी ही संधी साधून 19 ऑक्‍टोबरपासून ते अनिकेतला धमकावित होते. ऍनासोबतच्या लैगिंक संबंधांची क्‍लिप वडील उभे असलेल्या मतदार संघात व्हायरल करण्याचे धमकावत त्यांनी तीन लाखांच्या खंडणी मागितली. त्यामुळे अनिकेतने पुंडलिकनगर ठाण्यात तक्रार दिली. 

बंद खोलीत ठेवायला सांगितली खंडणी 
तीन लाख रुपये घेऊन अनिकेतला राजू सहाणीने बाबा पेट्रोल पंप, सिडको एन-पाच येथील महाविद्यालयात बोलाविले. पण पैसे घेण्यासाठी तो आला नाही. अखेर त्याने एन-पाच येथील एका पार्कसमोर बोलावले. तेथील वडाच्या झाडाजवळील वॉचमनच्या बंद खोलीत तीन लाख रुपये ठेवायचे त्याने सांगितले. 

दोघे लागले गळाला.. 
वॉचमनच्या खोलीत अनिकेतने तीन लाख ठेवण्यापुर्वी पुंडलिकनगर पोलिसांनी सापळा रचला. अनिकेतकडे हुबेहुब नोटांची बंडल देत ते वॉचमनच्या खोलीत ठेवण्याचे सांगितले. त्यानंतर अर्ध्या तासांनी विश्‍वनाथ माळी व कृष्णा क्षीरसागर यांनी तेथे जाऊन पैसे उचलुन पसार झाले पण पोलिसांनी पाठलाग करुन त्यांना पकडले. यानंतर तरुणी व राजु साहणीचा पोलिस शोध घेत आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: She would first have sex, then clip and blackmail her