बीड जिल्ह्यात शेतकरी प्रश्‍नांवर शिवसेनेचा मोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 November 2019

  • शेतकऱ्यांना एकरी 25 हजार भरपाईची मागणी 
  • वीजबिल सरसकट मोफ करा, पीकविमा द्या 
  • शासनाने मोफत बी-बियाणे वाटप करावे 
  • विद्यार्थ्यांचे शुल्क सरसकट माफ करावे 
     

अंबाजोगाई (जि. बीड) - परतीच्या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसंदर्भात शासनाने तत्काळ निर्णय घेण्यासाठी शिवसेनेतर्फे सोमवारी (ता. 25) मोर्चा काढून तीव्र निदर्शने करण्यात आली.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे व संपर्कप्रमुख आनंद जाधव, सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब अंबुरे, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, केज मतदारसंघाचे संपर्कप्रमुख परशुराम जाधव यांच्या नेतृत्वाखाली मुख्य रस्त्यावरून घोषणाबाजी करत मोर्चा काढण्यात आला.

हेही वाचा - साहब, किसान बहोत मुश्किल मे है

शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अतिवृष्टीने बाधीत शेतकऱ्यांना तत्काळ एकरी पंचवीस हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांचे वीजबील सरसकट माफ करावे, अतिवृष्टीमुळे शेतीचे शंभर टक्के नुकसान झाल्याने विमा कंपन्यांनी कुठलाही निकष न लावता सरसकट पीकविमा मंजूर करावा, शेतकऱ्याच्या मुलांची शालेय व महाविद्यालयीन फीस सरसकट माफ करावी, अतिवृष्टीने बाधीत शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी शासनाकडून मोफत बी-बियाणांचे वाटप करावे आदी मागण्या करण्यात आल्या. यासंदर्भात शासनाने तत्काळ कारवाई करावी अन्यथा शिवसेनतर्फे आंदोलन तीव्र केले जाईल, असेही निवेदनात म्हटले आहे. 

हेही वाचा - पीक नुकसान भरपाईपोटी पहिल्या टप्प्यात नऊ कोटी मदत

तालुकाप्रमुख अर्जुन वाघमारे, शहरप्रमुख गजानन मुडेगावकर, तालुका समन्वयक बालासाहेब शेप, युवा सेनेचे वैभव आजले, जिल्हा सहसंघटक अशोक गाढवे, संतोष काळे, महिला आघाडीच्या उषाताई यादव, विनोद पोखरकर, विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख अभिमन्यू वैष्णव, उपशहरप्रमुख गणेश जाधव, शिवकांत कदम, अर्जुन जाधव, युवा सेना उपशहरप्रमुख दिनेश उपरे, दीपक मुळूक, उपतालुकाप्रमुख नाथराव मुंडे, खंडू पालकर, वसंत माने, राम भोसले, बिटू चाटे, समाधान पिसाळ, शंकर भिसे, सुधाकर काचरे, बाबा भिसे, प्रताप खोडवे, बलभीम मगर आदींसह शेतकरी उपस्थित होते. 

हेही वाचा - पांढऱ्या सोन्याला कवडीमोल भाव, शेतकरी चिंतेत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena march on peasant issues in Beed District