राज्य शासनाचे तोलून मापून `शिवभोजन`

हरी तुगावकर
गुरुवार, 2 जानेवारी 2020

या भोजनालयातून गरीब जनतेला दहा रुपयात प्रत्येकी तीस ग्रॅमच्या दोन चपाती, शंभर ग्रॅम एक वाटी भाजी, शंभर ग्रॅम वाटीभर वरण, १५० ग्रॅम भात दिला जाणार आहे. म्हणजेच या शिवभोजनात जनतेला पोटभर नव्हे तर तोलून मापून भोजन देण्यात येणार आहे.

लातूर : शिवसेनेच्या वतीने गेल्या काही महिन्यापासून शिवभोजन योजनेचा गाजावाजा केला जात होता. विधानसभेच्या निवडणुकीतही या पक्षाने प्रचाराचा मुद्दा केला होता. अखेर शिवसेनेचे सरकार सत्तेत येताच या योजनेची घोषणा करण्यात आली. त्याचा आदेश नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी काढण्यात आला आहे.

या योजनेत आता राज्यातील अकरा कोटी जनतेपैकी दररोज केवळ १८ हजार जनतेलाच तोलून मापून शिवभोजन दिले जाणार आहे. या पैकी मराठवाड्यातील केवळ २ हजार ८५० लोकांनाच याचा लाभ देण्यात येणार आहे. मराठवाड्यात एवढीच गरीब जनता आहे का? असा प्रश्न आता निर्माण होत आहे.

दोन चपात्या अन वाटीभर भात

राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहिर केले होते. ही योजना कशी असेल, दररोज किती जनतेला याचा लाभ होईल याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. 

हे वाचलंत का?Video : दोन किलो मिठाई खाणारा उंदीर... पहा पराक्रम

अखेर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी या योजनेचे आदेश काढण्यात आले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात मुख्यालयाच्या ठिकाणी एक असे शिवभोजनासाठी भोजनालय असणार आहे.

या भोजनालयातून गरीब जनतेला दहा रुपयात प्रत्येकी तीस ग्रॅमच्या दोन चपाती, शंभर ग्रॅम एक वाटी भाजी, शंभर ग्रॅम वाटीभर वरण, १५० ग्रॅम भात दिला जाणार आहे. म्हणजेच या शिवभोजनात जनतेला पोटभर नव्हे तर तोलून मापून भोजन देण्यात येणार आहे.

भुकेलाही वेळेचे बंधन

राज्य शासनाने जनतेच्या भुकेलाही वेळेचे बंधन घातले आहे. दिवसभर कधीही शिवभोजन मिळणार नाही. या करीता दोन तासाचाच वेळ देण्यात आला आहे. दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंतच शिवभोजन घेता येणार आहे.

कार्यकर्ते होणार गब्बर

ही योजना सध्या अस्तित्वात असलेल्या  खानावळ, स्वयंसेवी संस्था, महिला बचतगट, भोजनालय, रेस्टॉरंट अथवा मेस अशा माध्यमातून हे शिवभोजन दिले जाणार आहे. यात गरीब जनतेला किती जेवण मिळते त्या पेक्षा कार्यकर्ते मात्र गब्बर होणार आहेत. दहा रुपयाला थाळी दिली जात असली तर  त्यात एका थाळीमागे ४० रुपयांचे अनुदान शासन देणार आहे. त्यामुळे कार्यकर्तेच गब्बर होणार असल्याचे दिसत आहे.

मराठवाड्यात फक्त २८५० लोकच भुकेले

या शिवभोजन योजनेत राज्यात दररोज फक्त १८ हजार लोकांना याचा लाभ दिला जाणार आहे. त्यात मराठवाड्यात दररोज केवळ दोन हजार ८५० लोकांना हे शिवभोजन मिळणार आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यात पाचशे, जालना तीनशे, परभणी तीनशे, हिंगोली दोनशे, बीड चारशे, नांदेड पाचशे, उस्मानाबाद २५० तर लातूर जिल्ह्यात चारशे लोकांनाच दररोज शिवभोजन दिले जाणार आहे. म्हणजेच मराठवाड्यात फक्त ऐवढेच लोक भूकेले आहेत का? असा प्रश्नही निर्माण होत आहे.

वाचा बिबट्याच्या तावडीतून असे बचावले दांपत्य


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ShivBhojan Thali By Shivsena Government For Poor Latur News