भाजपने जनतेला लॉलीपॉप देण्याचे काम केले : रामदास कदम 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

भाजपने साडेतीन वर्षांत राज्य व देशातील जनतेला केवळ लॉलीपॉप देण्याचे काम केले. याची जाणीव आता लोकांना होऊ लागली आहे. 2014 मधील मोदी लाट आता ओसली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आता भाजपची उलटी गिनती सुरू झाली.

- रामदास कदम, शिवसेना नेते

औरंगाबाद : भाजपने साडेतीन वर्षांत राज्य व देशातील जनतेला केवळ लॉलीपॉप देण्याचे काम केले. याची जाणीव आता लोकांना होऊ लागली आहे. 2014 मधील मोदी लाट आता ओसली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आता भाजपची उलटी गिनती सुरू झाली असल्याचा टोला राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी लगावला. 

शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी औरंगाबादेत शुक्रवार (ता. 20) सोलापूर आणि नगर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. त्यांनतर रामदास कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आदिवासी भागात वाढते कुपोषण राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, महिला, मुलींवर राजेरोसपणे होणारे बलात्कार आणि सरकारकडून सातत्याने दिली जाणारी खोटी आश्‍वासने याला जनता त्रासली आहे. मोदी यांच्यावर विश्‍वास ठेवून देशातील जनतेने भाजपला भरभरून मते दिली. पण साडेतीन वर्षानंतर त्यांचा भ्रमनिरास झाला. भाजपचे आमदार बलात्काराच्या प्रकरणात अडकल्याचे उघडकीस येत असतांनाच सर्वाधिक गुंड असलेला अशी या पक्षाची ओळख निर्माण झाली असल्याची टीका रामदास कदम यांनी यावेळी केली. 

शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न 

भाजपच्या कपटी राजकारणाला बळी न पडता शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे, त्यामुळे आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुका शिवसेना स्वतंत्रपणे लढणार आहे.

2014 मध्ये भाजपने आमच्या पाठीत खंजीर खुपसला होता, पण आता शिवसेना त्यांच्या कुठल्याही भूलथापांना बळी पडणार नाही. युती होणार असे भाजपचे नेते सांगून शिवसैनिक आणि सर्वसामान्यांमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोपही रामदास कदम यांनी केला. 

Web Title: Shivesena ramdas kadam Criticizes BJP