"शिवशाही'च्या एसीने काढला "घाम' 

विकास देशमुख
मंगळवार, 8 मे 2018

औरंगाबाद - कोकणात पर्यटनाला जाणाऱ्यांसाठी एसटी महामंडळाने औरंगाबाद ते सावंतवाडी या मार्गावर वातानुकूलित शिवशाही स्लीपर कोच बस सेवा सुरू केली; मात्र सोमवारी (ता. सात) मध्यरात्री एसी तिसऱ्यांदा बंद पडला. एसी बंद, त्यात खिडक्‍याही उघडत नसल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. 

औरंगाबाद - कोकणात पर्यटनाला जाणाऱ्यांसाठी एसटी महामंडळाने औरंगाबाद ते सावंतवाडी या मार्गावर वातानुकूलित शिवशाही स्लीपर कोच बस सेवा सुरू केली; मात्र सोमवारी (ता. सात) मध्यरात्री एसी तिसऱ्यांदा बंद पडला. एसी बंद, त्यात खिडक्‍याही उघडत नसल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. 

सोमवारी सायंकाळी 7.15 वाजता औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकावरून सावंतवाडीकडे शिवशाही स्लीपर कोच बस रवाना झाली. यामध्ये एकूण 12 प्रवासी होते. बस वाळूजजवळ जाताच तिचा एसी बंद पडला. परिणामी, प्रचंड उकाड्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. हा प्रकार सलग तीन वेळा झाला. प्रवाशांनी याबाबत चालक-वाहकास जाब विचारून त्यांच्याकडे असलेल्या पुस्तिकेत तक्रार नोंदविली. 

म्हणे, पुण्यातून दुसरी बस मिळेल
बसमधील प्रवासी सुनील कुंतुरवार (रा. टीव्ही सेंटर) यांनी याबाबत औरंगाबाद एसटी आगारप्रमुखांना कॉल करून माहिती दिली. त्यावर आगारप्रमुखांनी त्यांना ""पुण्यापर्यंत जा, तिथे दुसऱ्या बसची व्यवस्था करून देऊ,'' अशी उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यावर श्री. कुंतुरवार यांनी बसभाड्यातून एसीचे शुल्क वजा करावे, अशी मागणी केली; मात्र ""भाडे कमी होणार नसून तुम्ही ग्राहक न्यायालयात दाद मागा!'', असे उद्धट उत्तर दिले. 

दुरुस्तीचा पेच 
राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात असलेल्या शिवशाही बस भाडेतत्त्वावर घेतलेल्या आहेत. त्यामुळे प्रवासी असो किंवा नसो ज्या खासगी कंपनीकडून बस भाड्याने घेतलेल्या आहेत त्यांना त्यांचा मोबदला मिळतो; मात्र ऐन प्रवासात एसी बंद पडला किंवा अन्य बिघाड झाला, तर दुरुस्ती एसटीने करायची की खासगी कंपनीने हा पेच आहे. 

यापूर्वी एसीने घेतला होता पेट
उस्मानाबाद जिल्ह्यातील येडशी येथे 21 एप्रिलला रात्री अकराच्या सुमारास पुणे-उदगीर ही शिवशाही बस (एमएच 06 टी- 2609) बसस्थानकात येताच बसमधील वातानुकूलित यंत्रणेने अचानक पेट घेतला होता. यात बसमधील संपूर्ण वायरिंग जळून खाक झाली. या प्रकारामुळे या बसमध्ये 40 प्रवासांना बसस्थानकावर रात्र काढवी लागली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मिळेल त्या बसने प्रवाशांनी प्रवास केला. त्यानंतर 1 मे रोजी बीड जिल्ह्यातील होळ (ता. केज) जवळ शिवशाही बस पलटी होऊन रेणुका कल्याण माळी (वय 30, माळी चिंचोली) या शिक्षिकेचा मृत्यू झाला होता. 

शिवशाहीचे सध्याचे तिकीट दर 
-- प्रौढ......लहान मुले 

औरंगाबाद-सावंतवाडी 1,457.....799 
औरंगाबाद-नगर 256......128 
औरंगाबाद-शिवाजीनगर 526......263 
औरंगाबाद-स्वारगेट 553........277 
औरंगाबाद-सातारा 782.........391 
औरंगाबाद-कराड 904......452 
औरंगाबाद-कोल्हापूर 1,066......533 
औरंगाबाद-राधानगरी 1,187.........594

Web Title: Shivsshahi AC Bus Ticket Rate