esakal | धक्कादायक : जिंतुरातील प्राणवायू संपला; चार गंभीर रुग्ण परभणीला हलवले
sakal

बोलून बातमी शोधा

oxygen

धक्कादायक : जिंतुरातील प्राणवायू संपला; चार गंभीर रुग्ण परभणीला हलवले

sakal_logo
By
विनोद पाचपिल्ले

जिंतूर (जिल्हा परभणी) : कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चाललेले असताना जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजनचा साठा संपल्यामुळे ऑक्सीजनवर असलेल्या चार गंभीर रुग्णांना ऐनवेळी परभणी येथे हलविण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

शहरातील अल्पसंख्यांक वस्तीगृहात उभारण्यात आलेल्या कोव्हिड सेंटरमध्ये सद्यस्थितीत ३७ रुग्णांवर तर ग्रामीण रुग्णालयात १३ रुग्णांवर उपचार चालू आहेत. ग्रामीण रुग्णालयात १२ ऑक्सीजनयुक्त बेडची व्यवस्था होती. परंतु वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता आठ दिवसांपूर्वीच अजून १८ नवीन ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली. आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन चार दिवसापूर्वीच दहा ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध केले होते. परंतु ऑक्सीजनवर असलेल्या रुग्णांना मोठ्या प्रमाणावर आॅक्सीजन लागत असल्याने हे सिलेंडर पाच दिवसातच संपले. नवीन सिलेंडर मिळण्यासाठी ता. २६ एप्रिल रोजी परभणी येथे जिल्हा रुग्णालयात वाहन पाठवण्यात आले होते. परंतु तेथेच ऑक्सीजनची कमतरता असल्यामुळे जिंतूर तालुक्यासाठी सिलेंडर मिळाले नाहीत. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजनची गरज लक्षात घेऊन चार रुग्णांना परभणी येथे हलविण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी रविकुमार चांडगे यांनी दिली.

हेही वाचा - नांदेड : मांजरम परिसरात अवकाळी पाऊस; विज पडून म्हैस व वासरु ठार

जिंतूर शहरात लवकरच ऑक्सीजन प्लांट कार्यान्वित करु- आ.मेघनाताई बोर्डीकर

पालकमंत्री नवाब मलिक यांच्याशी चर्चा करुन आपण शहरात ऑक्सीजन प्लांट मंजूर केला. परंतु या प्लाटसाठी लागणारी साधन सामुग्री जर्मनी येथून येण्यासाठी आठ दिवसाचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर लवकरच ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित केला जाईल. त्यानंतर ऑक्सीजनची कमतरता रुग्णांना भासणार नाही. आमदारांनी ऑक्सीजन सेंटर स्वखर्चातून सुरु करावे असे सोशल मीडियावर काही रिकामटेकडे लोक मॅसेज व्हायरल करत आहेत. परंतु केवळ कोव्हिड सेंटर उभे करुन प्रश्न मिटणार नाही. त्यासाठी तज्ञ डॉक्टर व कर्मचारीही असणे महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागातील लोक चाचणी करण्यासाठी पुढे येत नसल्याने ते गंभीर होत आहेत. त्यामुळे ऑक्सीजनची गरज वाढत असून नागरिकांनी कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास त्वरित तपासणी करुन घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच कोविल लस घेण्यासाठी नागरिकांची ग्रामीण रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहेत. कोव्हिड लसीचा पुरवठा कमी होत असल्याने लोकांना वेळेवर लस घेता येत नाही. परंतु यानंतर खासगी रुग्णालयातही कोविड लस उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही आ. मेघनाताई बोर्डीकर यांनी सांगितले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image