
धक्कादायक बातमी : पिंपळखुटा येथे सीआरपीएफ जवानाची गळफास घेऊन आत्महत्या
हिंगोली : तालुक्यातील पिंपळखुटा येथे केंद्रीय राखीव दलाच्या जवानाने (सीआरपीएफ) शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. तीन) दुपारी एक वाजता घडली आहे. संजय योगाजी खंदारे (वय २८) असे या जवानाचे नांव असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील पिंपळखुटा येथील संजय योगाजी खंदारे हे मागील तीन ते चार वर्षापुर्वी केंद्रीय राखीव दलामध्ये रुजू झाले होते. सध्या ते जम्मू काश्मीर भागातील कुपवाडा येथे कर्तव्यावर होते. मागील काही दिवसांपुर्वीच एक महिन्याच्या सुट्टीवर आले होते.
दरम्यान, सोमवारी सकाळी ते घरुन शेतात गेले तेथे जेवण देखील त्यांनी केले. त्यानंतर दुपारी एक वाजता दुसऱ्या बाजूला असलेल्या शेतात जाऊन झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, त्यांच्या शेजारी असलेल्या शेतात नांगरणीचे काम सुरु होते. त्या ठिकाणी असलेले काही शेतकरी विहीरीवर पाणी पिण्यासाठी आले असता त्यांना संजय खंदारे यांचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेची माहिती गावात कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमख, बासंबा पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार मगन पवार आदींनी भेट दिली. या प्रकरणी बासंबा पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत संजय खंदारे यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे
Web Title: Shocking News Crpf Jawan Commits Suicide By Hanging At
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..