esakal | धक्कादायक : कळमनुरीत कोवीड समर्पित उपचार केंद्रात रुग्णांच्या नातेवाईकांचा सर्रास वावर

बोलून बातमी शोधा

कोविड
धक्कादायक : कळमनुरीत कोवीड समर्पित उपचार केंद्रात रुग्णांच्या नातेवाईकांचा सर्रास वावर
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कळमनुरी ( जिल्हा हिंगोली ) : येथील उपजिल्हा रुग्णालयाअंतर्गत असलेल्या कोवीड समर्पित आरोग्य उपचार केंद्रांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना भेटण्यासाठी त्यांचे नातेवाईक, निकटवर्तीय नियमित बिनधास्त ये- जा करत आहे. त्यानंतर हेच नातेवाईक सार्वजनिक ठिकाणी वावरत असल्यामुळे आजाराचा प्रादुर्भाव वाढण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाने लक्ष देण्याची वेळ आली आहे.

येथील उपजिल्हा रुग्णालया अंतर्गत कार्यान्वित असलेल्या कोवीड समर्पित आरोग्य उपचार केंद्रामध्ये बाधित झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. उपचार घेणाऱ्या रुग्णांचा हालहवाल पाहण्यासाठी वेळप्रसंगी त्यांना घरचे जेवण देण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक व त्यांच्या कुटुंबीयांमधील सदस्यांनी बिनधास्तपणे या उपचार केंद्रामध्ये आपला वावर सुरु केला आहे.

हेही वाचा - परभणी : रेमडेसिविर इंजेक्शन विकणाऱ्या परिचारिकेसह एकास अटक

या ठिकाणी सर्व बाधित रुग्णावर उपचार करताना वैद्यकीय अधिकारी व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून रुग्णांची देखभाल केली जात आहे. मात्र त्यानंतरही रुग्णांचे नातेवाईक सरळपणे उपचार केंद्रात दाखल होऊन रुग्णांची हालचाल विचारुन फिरुन येत आहेत. विशेष म्हणजे काही अतिउत्साही रुग्ण उपचार केंद्राबाहेर येत असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. या सर्व प्रकाराकडे उपचार केंद्रात बाहेर असलेले सुरक्षा रक्षक वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.

उपचार केंद्रात गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन लावण्यात आलेले आहे. मात्र अपुऱ्या कर्मचारी वर्गाअभावी ऑक्सिजन लावलेल्या रुग्णावर पूर्णवेळ लक्ष देण्यासाठी आरोग्य विभागामधील असलेल्या रिक्त जागांमुळे अडचणी झाल्या आहेत. त्यामुळे रुग्णांच्या कुटुंबातील सदस्यांना उपचार केंद्रात जाऊ देत असल्याचा अजब तर्क आरोग्य विभागातील काहींनी मांडला आहे. त्यामुळे उपचार केंद्रासाठी असलेल्या शासनाच्या नियमावलीला याठिकाणी हरताळ फासण्याचे काम होत आहे.

कोविड समर्पित उपचार केंद्रामध्ये दाखल असलेल्या रुग्णांना भेटावयास गेलेले नातेवाईक व रुग्णांच्या कुटुंबीयांमधील सदस्य सामूहिक ठिकाणी वावरत असल्यामुळे आजाराचा प्रादुर्भाव वाढण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. यातही विशेष म्हणजे या सर्व प्रकाराकडे आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहेत. या प्रकरणी जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाने लक्ष देऊन या प्रकारास पायबंद घालने गरजेचे झाले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे