धक्कादायक! पोटच्या मुलीला तीन वेळा विकले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

aurangabad

धक्कादायक! पोटच्या मुलीला तीन वेळा विकले

sakal_logo
By
टीम ई सकाळ

हदगाव : वेगवेगळ्या बतावण्याकरून पोटच्या मुलीला तीन वेळा विकणारे रॅकेट येथे उघडकीस आले आहे. वारकवाडी (ता. हदगाव, जि. नांदेड) येथील मुलीचे वडील, काका आणि सावत्र आई या तिघांनी हे कृत्य केले आहे. अठरावर्षीय विवाहित मुलीच्या तक्रारीवरून हदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी वाळूज (औरंगाबाद) भागात ही घटना घडल्याने तेथे हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी विशेष लक्ष दिल्यामुळे हे रॅकेट उघडकीस आले.

हेही वाचा: संततधार पावसामुळे पैठणमधील पाचोडसह परिसरातील पिके पाण्याखाली

पीडित अठरावर्षीय विवाहित महिला ही मूळची वारकवाडी (ता. हदगाव) येथील असून तिचे आजोळ मरडगा (ता. हदगाव) असल्याची माहिती आहे. ती एमआयडीसी वाळूज (औरंगाबाद) येथे राहत होती. तिचे वडील व काका एमआयडीसीमध्ये कामाला होते. सुरुवातीस पीडितेचे वडील व काका यांनी गोंडल (जि. राजकोट, गुजरात) येथे एका महिलेस या पीडितेला दोन लाख रुपयांना विकले.

त्यानंतर तिला नंदुरबार येथे एकाच्या घरी घेऊन गेले. तू इथेच थांब, मी आता परत येतो, असे सांगून वडील तिथून निघून गेले. या ठिकाणी चार लाख रुपयांत तिला विकले. त्यानंतर पुन्हा तिसऱ्या ठिकाणी कोळेवाडी (ता. माण, जिल्हा सातारा) नेले. तेथे दोन लाख रुपये घेऊन तिला विकून साध्या पद्धतीने लग्न लावून दिले. हा सर्व प्रकार वडील, सावत्र आई व काका या तिघांनी संगनमताने केला असल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे.

हा सर्व प्रकार कोणाला सांगितल्यास मला व मला पाठिंबा देणाऱ्या सर्वांना ठार मारण्याची धमकी दिल्याने माझी आई, बहीण व मी मुंबई येथे निघून गेले. हा प्रकार २०१८ पासून सुरू असून वाळूज (औरंगाबाद), सातारा आदी ठिकाणी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला असता दखल घेतली गेली नाही, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. अखेर तिने नांदेडचे पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्याकडे लेखी तक्रार केली.

गुन्हा दाखल, संशयित फरारी

पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्याकडे पीडितेने लेखी तक्रार केल्यानंतर त्यांनी सूत्रे हलविली. पीडितेची तक्रार हदगावचे पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक दीपक फोलाने यांना नोंद करण्याचे आदेश दिले. गुन्हा दाखल होत असल्याचे लक्षात येताच आरोपी फरारी झाले. दरम्यान, पोलिस अधीक्षकांनी पीडितेचा मोबाइल क्रमांकाचा शोध घेऊन तिची तक्रार हदगाव पोलिस स्थानकात नोंदवून घेत संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करून घेतला आहे.

loading image
go to top