
रांजोना येथील सार्वजनिक विहिरीला मुबलक पाणी आहे. परंतु, तेथील विद्युत मोटार मागील पंधरा ते वीस दिवसांपासून चोरीला गेलेली आहे. यामोटारीचा अद्याप शोध लागला नसून यामुळे अख्या गावाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
वसमत (जि. हिंगोली) : रांजोना (ता. वसमत) येथील सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीवरील विद्युत मोटारच चोरट्यांनी लांबविली. त्यामुळे अख्या गावाला पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावात इतर खासगी पाणीस्त्रोत असले तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाणी देण्यास कोणी फारसे धजावत नसल्याचे चित्र आहे.
रांजोना येथील अंदाजे तीन हजार लोकसंख्या आहे. गावात नऊ ग्रामपंचायत सदस्य आहेत. गावात बळेगाव कॅनॉलजवळ असलेल्या रुखी शिवारात असलेल्या सार्वजनिक विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो. सध्या विहिरीला मुबलक पाणी आहे. परंतु, तेथील विद्युत मोटार मागील पंधरा ते वीस दिवसांपासून चोरीला गेलेली आहे.
हेही वाचा - हिंगोलीला पुन्हा हादरा, एकाची भर, संख्या पोहचली १५ वर
विद्युत मोटारच चोरीला
ग्रामसेवक बी. के. नाईक यांनी हट्टा पोलिस ठाण्यात तक्रारही दिलेली आहे. वीस दिवस उलटले तरी विद्युत मोटारीचा तपास अद्याप लागलेला नाही. विद्युत मोटारच चोरीला गेल्याने गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावात पाणीटंचाईबाबत ओरड होत असल्याने दुसरी विद्युत मोटार बसविण्यात आली.
दुसरी विद्युत मोटार बसविली
मात्र, ही मोटार पाणी ओढत नसल्याचे ग्रामसेवकांचे म्हणणे आहे. दरवर्षी गावात पाणीटंचाई असते. या वर्षी विहिरीला पाणी आहे ; तर ग्रामपंचायतच्या नियोजनाअभावी गावकऱ्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. कडक उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
कोरोनामुळे पाणीही मिळेना
सार्वजनिक विहिरीवर चार मोटारी आहेत. त्यापैकी एक चोरीला गेलेली आहे. तसेच पाणीपातळी खोल गेल्यामुळे गावातील सार्वजनिक हातपंपालाही पाणी येत नाही. ज्याच्याकडे घरगुती बोअरला पाणी आहे. ते कोरोनामुळे पाणी देत नाहीत. शेतातून पाणी आणावे तर शेतातील वीजपुरवठा गूल होत आहे.
पाणीसमस्या मिटविण्याची मागणी
अशा अनेक संकटांचा सामना सध्या रांजोना ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. शेतातील मशागतीचे कामे सोडून पाण्यासाठी भटकंती होत आहे. याकडे लक्ष देऊन गावातील पाणीटंचाई लवकरात लवकर दूर करावी, अशी मागणी गावकऱ्यांतून केली जात आहे.
कवडा येथील विहिरीचे काम पूर्णत्वाकडे
पोतरा(जि. हिंगोली) : कळमनुरी तालुक्यातील कवडा येथे आदिवासी उपयोजनेतून मंजूर झालेल्या पाणी पुरवठ्याच्या विहिरीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीश पाचपुते यांच्या पुढाकारातून हे काम हाती घेण्यात आले आहे.
येथे क्लिक करा - बिहार राज्यातील ५८ मजुरांचे पलायन
डॉ. सतीश पाचपुते यांचा पुढाकार
कवडा गावाची लोकसंख्या अंदाजे बाराशे ते चौदाशे आहे. येथे दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत होती. या बाबत खासदार राजीव सातव व तत्कालीन आमदार डॉ. संतोष टारफे यांच्याकडे गावकऱ्यांनी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीश पाचपुते यांनी यासाठी पुढाकार घेत प्रस्ताव तयार केला.
१४ लाख रुपयांचा निधी
यासाठी आदिवासी उपयोजनेतून १४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आता विहिरीचे काम पूर्णत्वास गेले आहे. या निधीतून विहीर, मोटारपंप बसविण्यात येत आहे. आता उर्वरित कामासाठी खासदार राजीव सातव यांच्या माध्यमातून गावापर्यंत पाइपलाइन करून घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीश पाचपुते यांना सरपंच बबन मारकळ, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामजी बापू, तुकाराम कपाटे, शंकर खुडे, ग्रामसवेक अनिल वाडीकर आदी सहकार्य करीत आहेत.