धक्कादायक : इकडे पोलिस आहेत, उद्या फोन करतो म्हणाल्या अन्...

प्रल्हाद कांबळे
मंगळवार, 24 मार्च 2020

त्यांच्याकडून नऊ महिण्याच्या बाळाला जप्त केले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी सोमवारी (ता. २३) रात्री लातूर फाटा येथे केली. 

नांदेड : शहरातील लहान लेकरांचे अपहरण करून विक्री करणाऱ्या महिलांच्या टोळीला अटक केली. त्यांच्याकडून नऊ महिण्याच्या बाळाला जप्त केले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी सोमवारी (ता. २३) रात्री लातूर फाटा येथे केली. 

जिल्ह्यात लहान लेकरांना विक्री करणारी टोळी सक्रीय झाल्याची गुप्त माहिती पोलिस अधीक्षक  विजयकुमा मगर आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड यांना मिळाली. त्यांनी स्थआनिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना सांगितल्यानंतर त्यांनी आपले पथक कार्यरत केले. 

ईकडे पोलिस जास्त आहेत असे सांगून सोमवारी तुम्हाला फोन करतो

शहर व जिल्ह्यातून पालकांची नजर चुकवून अंगणात खेळणारी लहान लेकर उचलून नेऊन अपहरण करून विक्री करणारी टोळी सक्रीय झाल्याने पोलिसांसह पालकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अशीच एक टोळी नऊ महिण्याच्या लेकराला विक्री करण्यासाठी पोलिसांमार्फत बनावट ग्राहक तयार करून एक महिला पोलिस व एका पोलिसाला लातुर फाटा येथे पाठविले. मात्र रविवारी (ता. २२) जनता कर्फ्यू असल्याने ईकडे पोलिस जास्त आहेत असे सांगून सोमवारी तुम्हाला फोन करतो असे लेकरांची विक्री करणाऱ्या महिलांनी सांगितले. 

हेही वाचानांदेड शहरातील साठे चौकावर वाहतुकीचा भार

बाळाचा सौदा दोन लाख रुपयात

सोमवारी (ता. २३) सायंकाळी टोळीतील एक महिलेनी बनावट ग्राहक असलेल्या महिला पोलिस पंचफुला फुलारी व सखाराम नवघरे यांना बोलावून घेतले. रात्री सातच्या सुमारास तीन महिला एका नऊ महिण्याच्या बाळाला घेऊन आल्या. या बाळाचा सौदा दोन लाख रुपयात झाला होता. बाळाला ताब्यात घेऊन पैसे मोजण्याचे नाटक करत असतांना सहाय्यक पोलिस निरीक्षक रमाकांत पांचाळ यांनी आपले सहकारी सलीम बेग, संजय केंद्रे, बालाजी हिंगनवार, संजीव जिंकलवाड, बालाजी यादगीरवाड यांना सोबत घेऊन कारवाई केली. यावेळी तीन महिलांना व एका लेकराला ताब्यात घेतले. 

येथे क्लिक करा - कोरोना : नांदेडचे ते पाचही रिपोर्ट निगेटीव्ह

या आहेत महिला टोळीतील सदस्या

लेकर विकणाऱ्या शोभाबाई दिगंबर खोडे (वय ३५) रा. गरडगाव ता. खामगाव, जिल्हा बुलढाणा, मिनाबाई विजय पडूळकर (वय ३४) रा. मालटेकडी, नांदेड, सिमरनकौर खालसा (वय ५५) सिडको, नांदेड, मेहाराखान अनवरखान पठाण (वय ३०) रा. मनिषाबाद, ता. कुळवा, जिल्हा ठाणे, पार्वती गणेश जाधव (वय ५२) रा. शिनगरवाडी ता. भोकर यांना अटक केली. सर्वप्रथम या महिलांनी जप्त केलेल्या बाळाबद्दल माहिती देण्यास उडवाउडवी दिली. त्यांच्या सांगण्यावरून काही महिलांची चौकशी करण्यात आली. त्यांच्यात व चौकशी केलेल्या महिलांच्या बोलण्यात तफावत आढळून आली. 

विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला

या पाचही महिलांना श्री पांचाळ यांनी नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात हजर केले. त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक रमाकांत पांचाळ यांच्या फिर्यादीवरुन विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळाला शिशूगृहात दाखल केले असून अटक केलेल्या या पाचही महिलांना मंगळवारी (ता. २४) न्यायालयासमोर हजर करणार असल्याचे पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shocking: There are cops, calling tomorrow and saying nanded news