esakal | हिंगोलीत दिवसाआड उघडणार दुकाने
sakal

बोलून बातमी शोधा

hingoli photo

सोमवारपासून (ता. चार) दिवसाआड भाजीपाला, जीवनावश्यक वस्‍तू विक्रीची दुकाने सुरू होणार असल्याचे आदेश जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काढले आहेत. बाजारासह किराणा दुकान, भाजीपाला, दूध विक्री केंद्र, परवाना असलेले चिकन, मटन शॉप आदींचा समावेश आहे. 

हिंगोलीत दिवसाआड उघडणार दुकाने

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगोली: जिल्‍ह्यात कोरोनाबाधितांची वाढत असलेली संख्या लक्षात घेता जिल्‍हा प्रशासनाने पाच दिवसांपासून सर्वच आस्‍थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. आता सोमवारपासून (ता. चार) दिवसाआड भाजीपाला, जीवनावश्यक वस्‍तू विक्रीची दुकाने सुरू होणार असल्याचे आदेश जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काढले आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक किंवा खासगी जागेत पाच किंवा त्‍यापेक्षा अधिक व्यक्‍तींनी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे याला मनाई करण्यात आली आहे. तसेच जिल्‍ह्यात कोरोनाबाधितांची वाढत असलेली संख्या लक्षात घेता जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी बुधवारपासून (ता. २९) ते रविवारपर्यंत (ता. तीन) जीवनावश्यक वस्‍तूंच्या दुकानांसह दिवसाआड सुरू असलेला बाजारदेखील बंद केला होता.

हेही वाचालॉकडाउनचा फटका: टोमॅटो पिकात सोडली जनावरे

सकाळी नऊ ते दुपारी एकपर्यंतची वेळ
 
 
आता परत बाजारासह किराणा दुकान, भाजीपाला, दूध विक्री केंद्र, परवाना असलेले चिकन, मटन शॉप, बेकरी, स्‍वीट मार्ट संबधित दुकाने दिवसाआड सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ही दुकाने सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळात सुरू राहणार आहेत. 

इलेक्ट्रिक्स दुकानांचाही समावेश 

तसेच कृषी सेवा केंद्र, कृषी यंत्र, अवजारे, ट्रॅक्‍टर, त्‍याचे सुटे भाग या दुकानांसह इलेक्ट्रिक्स वस्‍तू विक्रींची दुकानेदेखील सुरू राहणार आहेत. सोमवार (ता. चार), बुधवार (ता.सहा), शुक्रवार (ता.आठ), रविवार (ता. दहा) मंगळवार (ता. १२), गुरुवार (ता. १४), शनिवार (ता. १६) या दिवशी ठरवून दिलेल्या वेळाप्रमाणे दुकाने सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

एक मीटरचे अंतर बंधनकारक
 
यासाठी संबधितांनी दुकाने सुरू करताना जागेचे सॅनिटायझेशन करूनच सुरवात करावी, दुकानातील कामगार, खरेदीदार यांची नोंद ठेवणे, कामगारांनी मास्‍कचा वापर करणे, खरेदीसाठी आलेल्या ग्राहक व विक्रेत्यांत एक मीटरचे अंतर ठेवणे, कामगारांची तपासणी थर्मल गणने करणे आदी अटीही बंधनकारक करण्यात आल्या आहेत.

आदेशाचे पालन करावे लागणार

तसेच खरेदीसाठी येणाऱ्यांनी दुचाकी, चारचाकी वाहनाचा वापर करू नये, पायी येऊन साहित्याची खरेदी करावी, दिलेल्या आदेशाचे पालन करावे, तसे न झाल्यास दंडात्‍मक कारवाई करण्यात येईल, असे आदेश जिल्‍हाधिकारी श्री. जयवंशी यांनी दिले आहेत.


हिंगोलीत कोरोनाबाधितांचे अर्धशतक

हिंगोली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५३ झाली असून यातील उच्च रक्तदाब, मधूमेहाचा आजार असलेल्या एसआरपीएफच्या चार जवानांना विशेष काळजी म्हणून औरंगाबाद येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. तब्बल ४७ जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच इतर पाच जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

येथे क्लिक कराधक्कादायक : हिंगोलीत कोरोनाबाधितांचे अर्धशतक

एक रुग्ण कोरोनामुक्त रुग्णाला घरी सोडले.

जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या सात क्वॉरंटाइन सेंटरमध्ये शनिवारपर्यंत (ता.एक) एक हजार २९१ संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले होते. यातील ५३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील एक रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्याला घरी सोडण्यात आले.

८७२ संशयित रुग्णांवर उपचार

सध्या ४७१ रुग्णाचे स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. यामध्ये हिंगोली येथील आयसोलेशन वार्डात सात, वसमत येथील शासकीय क्वॉरंटाइन सेंटरमध्ये ४१, कळमनुरी २१७, औंढा नागनाथ ६१, सेनगाव दोन, हिंगोलीतील क्वॉरंटाइन सेंटरमधील १४३ जणांचा समावेश आहे. दरम्यान, यातील ७६७ संशयित रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने यातील ४११ जणांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या सात सेंटरमध्ये ८७२ संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
 

loading image