एकीकडे शॉर्टसर्किने तर दुसरीकडे आगीमुळे ऊस जळून खाक 

सकाळ वृतसेवा 
Friday, 6 November 2020

परभणी जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांत शेतकऱ्यांच्या ऊसाचे नुकसान झाले आहे. यात एकीकडे शॉर्टसर्किने तर दुसरीकडे आगीमुळे ऊस जळून खाक झाला आहे.  

पाथरी ः शॉर्टसर्किट झाल्याने दोन शेतकऱ्यांचा चार एक्कर ऊस जळून खाक झाल्याची घटना (ता.सहा) रोजी पोहेटाकळी शिवारात घडली. तालुक्यातील पोहेटाकळी येथील शेतकरी दिनकर गंगाधर बागल यांच्या गट नं १७२ मधील तीन एकर तर भागवत जनार्दन बागल यांच्या गट नं १७० मधील एक एकर ऊस शॉटसर्किट झाल्याने जळून खाक झाला. ही घटना दुपारी बारा वाजता घडली. घटनेचा पंचनामा करुन मदत द्यावी व सदर ऊस गाळपास नेण्याचे कारखान्यास आदेश द्यावेत अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.तर दुसऱ्या घटनेत ताडकळस जवळ आगीत तीन एकरांतील ऊस खाक झाल्याची घटना कळगाववाडी (ता.पूर्णा) शिवारात गुरुवारी (ता.पाच) दुपारी घडली. फुलकळस येथील भुंजग दत्तराव शिराळे यांचे हे शेत आहे. वीजतारांचे घर्षण होऊन ही घटना घडली असून शिराळे यांचे सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले. आर्थिक मदत मिळावी अशी मागणी त्यांनी महावितरण, महसूल विभागाकडे केली आहे.  

विहिरीत पडून 
माय-लेकाचा मृत्यू 

मानवत ः विहिरीत पडून माय-लेकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना इरळद (ता. मानवत) येथे घडली. चोवीस तासांनंतर शुक्रवारी (ता.सहा) दोघांचे मृतदेह सापडले. भारत पवार (रा.कोलदांडी तांडा ता.जिंतूर) हे इरळद येथे सालगडी म्हणून कार्यरत आहेत. त्यांची पत्नी रेणुका (वय २८) व मुलगा सेहवाग (दोन) गुरवारी (ता.पाच) बेपत्ता झाले होते. शेतातील विहिरीत आज सकाळी दहाच्या सुमारास सेहवागचा मृतदेह आढळला. विहिरीला बरेच पाणी असल्याने रेणुकाचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या. वीजपंपाने पाण्याचा उपसा केल्यानंतर दुपारी चारच्या सुमारास तिचा मृतदेह आढळला. कोल्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी झाली. मानवत पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली. 

हेही वाचा - कृषी विद्यापीठातील अधिकारी- कर्मचाऱ्याचे सामुहिक रजा आंदोलन

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार 
देवगावफाटा ः दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक बसल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना औरंगाबाद-नांदेड महामार्गावरील देवगावफाटा येथून जवळच असलेल्या करपरा नदीच्या पुलाजवळील वळणावर शुक्रवारी (ता.सहा) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. प्रविण जगदीश राठोड (वय २७ रा.शिळोणा. ता.पुसद. जि.यवतमाळ) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेची चारठाणा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. देवगावफाटा येथून (एमएच २६ झेड - ७६७५) क्रमांकाच्या दुचाकीवर जिंतूरकडे जात असताना दुचाकी करपरा नदीच्या पुलाजवळ आली असता पाठीमागून आलेल्या वाहनाने जोराची धडक दिल्यामुळे दुचाकीवरील प्रविण राठोड या युवकाच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागी मृत्यू झाला. घटनेची माहिती चारठाणा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बळवंत जमादार यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली. 

हेही वाचा - परभणी : जिल्ह्यात कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव, कृषी विभागाने सुचविल्या उपाययोजना

लाच घेताना तलाठ्याचा सहायक जाळ्यात 
परभणी ः कारेगाव (ता.परभणी) सजाच्या तलाठ्याच्या सहायकास सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (ता.सहा) सकाळी अटक केली. प्लॉट फेरफारसाठी तलाठ्याकडे गेला होता. त्यावेळी तेथे त्यांचे सहायक मदन चोपडे होते. या कामासाठी सात हजार रुपये लागतील असे त्यांनी सांगताच तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. या विभागाचे उपअधीक्षक भरत हुंबे, पोलिस निरीक्षक अमोल कडू व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा लावून सात हजार स्वीकारताना मदन चोपडेला पकडले. त्याच्याविरुद्ध नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती हुंबे यांनी दिली. 

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Short circuit on one side and fire on the other, Parbhani News