देशात 130 कोटी ब्राह्मण : श्रीपाल सबनीस 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

देशात साडेतीन टक्के ब्राह्मण आहेत, हा गैरसमज आहे. जो जात मानतो, तो ब्राह्मण. या न्यायाने देशात 130 कोटी ब्राह्मण आहेत

औरंगाबाद : "देशात साडेतीन टक्के ब्राह्मण आहेत, हा गैरसमज आहे. जो जात मानतो, तो ब्राह्मण. या न्यायाने देशात 130 कोटी ब्राह्मण आहेत,'' असा दावा ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी केला. महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात मतभेद जरूर होते; पण कुणाच्याही देशभक्तीबद्दल शंका घेता येणार नाही, असेही ते म्हणाले. 

महात्मा गांधी सर्वोदय भवन येथे गांधी जयंती सप्ताहाचा गुरुवारी (ता. दहा) समारोप झाला. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. श्रीपाल सबनीस यांचे "सामाजिक सौहार्द : सामाजिक सद्‌भावना' या विषयावर व्याख्यान झाले. "भारत जोडण्याची जादू महात्मा गांधी या नावात आहे. गांधींचा विचार अंगीकारून, त्यांचे सतत स्मरण-पूजन करूनही देशाच्या पंतप्रधानपदावर बसलेली व्यक्ती नेहरू-पटेल यांच्यात भांडणे लावण्याचा प्रयत्न करते. याच देशात गोडसेला आदर्श मानणारी एक साध्वी गांधींच्या पुतळ्याला गोळ्या घालण्याचे विकृत काम करते. महापुरुषच जिथे सुरक्षित नाहीत, तिथे तुम्ही-आम्ही कसे सुरक्षित राहणार,'' असा सवाल श्रीपाल सबनीस यांनी केला. ''महात्मा गांधींच्या मारेकऱ्याची मंदिरे देशात उभारली जात आहेत. त्याला काही संघटना बळ देतात, ही दुर्दैवाची बाब आहे. आजच्या तरुणांची महात्मा गांधींशी भेट घडवल्याशिवाय देशाचे भले होणार नाही, असे उद्‌गारही त्यांनी काढले. 

ज्येष्ठ सर्वोदयी नेते पन्नालाल सुराणा यांनी अध्यक्षीय समारोप केला. प्रा. श्रीराम जाधव यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते ज्ञानप्रकाश मोदाणी, प्रा. प्रताप बोराडे, अंकुश भालेकर, सुभाष लोमटे, डॉ. शेख इकबाल मिन्ने यांच्यासह तरुणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shripal Sabnis said, 130 crore brahmins in the country