एकट्याच्या मतदानाने खूप फरक पडेल!

अनिल जमधडे  
मंगळवार, 22 जानेवारी 2019

औरंगाबाद - मतदान ही लोकशाहीतील अत्यंत आवश्‍यक प्रक्रिया आहे. मी एकट्याने मतदान केल्याने काय फरक पडणार ही प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. मतदार नोंदणीवरही त्याचा परिणाम दिसतो. असे असले तरीही प्रगल्भ लोकशाहीसाठी प्रत्येकाने मदतानाचा हक्क बजाविलाच पाहिजे. 

औरंगाबाद - मतदान ही लोकशाहीतील अत्यंत आवश्‍यक प्रक्रिया आहे. मी एकट्याने मतदान केल्याने काय फरक पडणार ही प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. मतदार नोंदणीवरही त्याचा परिणाम दिसतो. असे असले तरीही प्रगल्भ लोकशाहीसाठी प्रत्येकाने मदतानाचा हक्क बजाविलाच पाहिजे. 

आपल्याकडे स्वातंत्र्यदिन (१५ ऑगस्ट) व प्रजासत्ताकदिन (२६ जानेवारी) या दोन्ही दिवशी प्रत्येकाच्या अंगात देशसेवा, राष्ट्रभक्ती, देशाबद्दल प्रेमाची भावना उफाळून येते; मात्र त्यानंतर देशाबद्दल फार आस्था दिसत नाही. लोकशाही ही शेवटच्या वर्गापर्यंत झिरपली पाहिजे, यासाठी प्रत्येक भारतीयाने सजगपणे लोकशाही मूल्य रुजविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. लोकशाहीमध्ये प्रत्येकाच्या मताला एकच किंमत आहे. 

अगदी करोडपती आणि शेवटच्या घटकातील अशा दोन्ही वर्गांतील व्यक्तीच्या मताची एकच किंमत आहे. म्हणूनच प्रत्येकाने मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य मानले पाहिजे. मतदान करणे हा खरं तर देशसेवेचाच एक भाग आहे. लोकशाही सुदृढ 

व सक्षम असेल, तर देशाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, विकासाला गती मिळते. आगामी तीन महिन्यांत लोकसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. या निवडणुकांच्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर मतदान नोंदणी करून घेणे आवश्‍यक आहे. अठरा वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक तरुण-तरुणीने मतदार नोंदणी करून घेतलीच पाहिजे आणि न चुकता मतदानाचाही हक्क बजाविलाच पाहिजे. 

हे अजिबात करू नका
मतदानानिमित्त सुटी आहे म्हणून या सुटीचा आनंद उपभोगण्यासाठी सहलीचा बेत काढणार असाल तोच खरा देशद्रोह ठरू शकतो. मतदान न करणे आणि पुढची पाच वर्षे ओरडत राहणे हा नाकर्तेपणाच आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदान कसे करता येईल यासाठी प्लॅनिंग करा, संपूर्ण कुटुंबीयांना सोबत घेऊन मतदानाचा हक्क बजाविण्याची गरज आहे. विशेष म्हणजे घरातील तरुण मंडळींनी यासाठी पुढाकार घेऊन मतदान करून घेणे आवश्‍यक आहे.

तरूणाई म्हणते...
उदासीनता झटकण्याची गरज- रोहिणी साबळे

राष्ट्रीय मतदार दिन म्हणजे लोकशाहीला बळकट करणारा दिवस. प्रत्येक व्यक्तीने आपला मतदान करण्याचा अधिकार हा वापरलाच पाहिजे. हल्ली राजकीय, तसेच सामाजिक अनास्थेमुळे मतदान न करण्याकडे जनतेचा कौल दिसतो; पण ही उदासीनता झटकून मतदानाचा हक्क बजावूनच आपण सत्तांतर करू शकतो. सजग नागरिकांनो, जागे व्हा आणि आपला मतदानाचा हक्क जरूर बजावा.

नागरिकांचे आद्य कर्तव्य - प्रियांका गवई
 मतदान हक्क बजाविणे हे प्रत्येक नागरिकांचे आद्य कर्तव्य आहे; परंतु भ्रष्ट व निष्क्रिय उमेदवार विजयी होत असल्याने, मतदार निराशेच्या गर्तेत आहेत. उदासीन मानसिकतेतून मतदार आपल्या कर्तव्याकडे पाठ फिरवितो. भ्रष्ट व निष्क्रिय लोकप्रतिनिधींना रोखणारा कायदा करायला हवा. मतदार नोंदणी प्रक्रिया राबविण्याबाबत प्रशासनही उदासीन आहे. 

मतदानासाठी प्रोत्साहन द्या - राहुल मुगदल
मतदार नोंदणी वाढविण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देणे आवश्‍यक आहे. प्रत्येक नवमतदारांची नोंद करून घेणे प्रशासनाची जबाबदारी आहे; परंतु या प्रक्रियेला दुय्यम स्थान देण्यात येते. मोबाईल क्रमांकही आधारशी जोडला जात आहे; मात्र बोगस मतदारांना ओळखण्यासाठी कुठलाही नियम करण्यात येत नाही, हे दुर्दैव आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी मी मतदान करणारच.

ईव्हीएमवर आक्षेप - अक्षय शेजूळ  
येत्या लोकसभा निवडणुकीसाठी मी मतदार म्हणून प्रथमच मतदान करणार आहे. लोकशाही प्रक्रियेवर नागरिक म्हणून विश्वास आहे; मात्र ईव्हीएम मशीनबाबत नागरिकांचा आक्षेप असताना निवडणूक आयोग त्याकडे दुर्लक्ष का करीत आहे? यामुळे मतदार मतदानापासून परावृत्त होऊ शकतो, याचे गांभीर्य लक्षात घायला हवे.

Web Title: A single vote will be a big difference

टॅग्स