
बहिणीच्या लग्नाकरिता फटाके आणण्यासाठी गेलेला भाऊ अपघातात ठार, डॉक्टर होण्याचे स्वप्न राहिले अधुरे
सिरसाळा (जि.बीड) : घरची गरिबी असलेल्या चव्हाण कुटुंबात तीन मुली आणि एकुलता एक मुलगा. पण सचिन पहिल्यापासून अभ्यासात हुशार आणि मेहनती. या बळावरच त्याचा वैद्यकीय शिक्षणासाठी (बीएएमएस) पहिल्या यादीत प्रवेश निश्चित झाला.
मात्र, बहिणीच्या लग्नासाठी लागणारे फटाके आणण्यासाठी गेलेल्या सचिनवर काळाने घाला घातला आणि डॉक्टर होण्याचे त्याचे स्वप्नही अधुरे राहीले. शिवाय बहिणीच्या डोक्यावर अक्षदाही टाकत्या आल्या नाहीत.
लातूर जिल्ह्यातील शेकडो कोंबड्या कशामुळे मृत पावल्या? परिसरात भीती
परळी-बीड मार्गावरील तपोवन पाटीजवळील पेट्रोल पंपाजवळ शनिवारी (ता.९) सकाळी नऊच्या दरम्यान घडलेल्या अपघातात सचिन शिवाजी चव्हाण (वय २१) हा जागीच ठार झाला तर त्याचा चुलत भाऊ जखमी झाला. धारूर तालुक्यातील देवठाणा गावातील शेरी तांड्यावर या घटनेने शोककळा पसरली आहे.
या तांड्यावरील अंजली चव्हाण हिचा शनिवारी विवाह सोहळा होता. विवाह सोहळ्यासाठी लागणारे फटाके व इतर साहित्य आणण्यासाठी सचिन चव्हाण व त्याचा चुलत भाऊ नितीन आप्पासाहेब चव्हाण हे दोघे दुचाकीने (एम.एच.२० एफ. ६८९५) सिरसाळा गावाकडे निघाले होते.
अर्ध्यावरती डाव मोडला... अपघातात पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी
याचदरम्यान, परळी-बीड रोडवरील तपोवन पाटीजवळून रिकामा ट्रॅक्टर (एम. एच. २१ ए. डी. ३७५) गावाकडे जात होता. येथे दुचाकी व ट्रॅक्टरची समोरासमोर जोराची धडक होऊन सचिन चव्हाण याचा जागीच मृत्यू झाला. तर नितीन हा गंभीर जखमी झाला. जखमीवर लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेनंतर तांड्यावरील विवाह सोहळा साध्या पद्धतीने उरकण्यात आला.
(edited by- pramod sarawale)