दोन चुलतबहिणींना पळविण्याचा प्रयत्न; माजलगावच्या तिघांना सक्तमजुरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

माजलगाव तालुक्‍यात चार वर्षांपूर्वी ध्वजवंदनासाठी शाळेत निघालेल्या दोन चुलतबहिणींना तीन जणांनी पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात तिघा जणांना माजलगाव येथील अपर सत्र न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी तीन वर्षे सक्तमजुरी व आठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे

माजलगाव (जि. बीड) : ध्वजवंदनास निघालेल्या दोन अल्पवयीन चुलत बहिणींना पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन आरोपींना दोषी ठरवून बुधवारी (ता. 12) येथील अपर सत्र न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी तीन वर्षे सक्तमजुरी व आठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

गोपाल शिवाजी भोसले, औदुंबर मगन रिंगणे (दोघे रा. खेर्डा खु., ता. माजलगाव), सचिन आसाराम मोरे (रा. तालखेड, ता. माजलगाव) अशी आरोपींची नावे आहेत.

26 जानेवारी 2016 रोजी सकाळी साडेसहा वाजता दहावीत शिकणारी 16 वर्षीय मुलगी आपल्या चुलत बहिणीसह ध्वजवंदनासाठी शाळेत जात होती. शाळेपासून 200 मीटर दूर असताना रस्त्याच्या कडेला एक पांढऱ्या रंगाची कार (एमएच-44, जी-0649) उभी होती. रस्त्याने जाताना गाडीतून अचानक तिघे जण खाली आले. त्यांनी एकीचा हात पकडून गाडीकडे ओढण्याचा प्रयत्न केला; परंतु दोघींनीही त्यांना कडाडून विरोध केला.

डॉक्टर म्हणतात, चिकन खाल्ल्याने कोरोना...

यावेळी झटापटीनंतर दोघींनीही आरडाओरड केली. त्यानंतर शाळेतील शिक्षक, विद्यार्थी धावत आले. त्यांना पाहून तिघेही कारमधून सुसाट निघून गेले. याप्रकरणी अपहरणाचा प्रयत्न, विनयभंग व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

तत्कालीन पोलिस निरीक्षक एस. एम.चाटे यांनी तपास करून अपर सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांच्यासमोर खटला चालला. न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोषी ठरवून तीन वर्षे सश्रम कारावास, आठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

व्हायरल क्लिपमधला अमोल कोण...

वरिष्ठ सहायक सरकारी अभियोक्ता अजय तांदळे यांनी सरकार पक्षाकडून बाजू मांडली. या प्रकरणात एका पीडितेच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला होता. तिच्यासह मदतीसाठी आलेले शिक्षक; तसेच तपास अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. साक्षी पुरावे व सरकारी वकील अजय तांदळे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sisters Kidnapping Case Beed Majalgaon News