esakal | डॉक्टर म्हणतात, चिकन खाल्ल्याने कोरोना होत नाही
sakal

बोलून बातमी शोधा

Latur News

डॉक्टर म्हणतात, चिकन खाल्ल्याने कोरोना होत नाही

sakal_logo
By
सुशांत सांगवे

लातूर : चिकन खाल्ल्यामुळे कोरोना व्हायरसची लागण होते, अशी माहिती सोशल मिडियावर पसरत आहे. या पोस्ट चुकीच्या आणि खोडसाळपणाने प्रसारित केल्या जात आहेत. चिकन-मांसाचा कोरोनाशी दुरान्वयेही संबंध नाही, असा दावा पशुसंर्वधन विभागाचे सहायुक्त डॉ. नानासाहेब कदम यांनी बुधवारी येथे केला. चिकन खाणे आरोग्याला मुळीच धोकादायक नाही, असेही ते म्हणाले.

पोल्ट्री व्यावसायिक संघटना व चिकन विक्रेता संघटनेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. कदम यांनी ही माहिती दिली. यावेळी पोल्ट्री व्यावसायिक डॉ. विजय जाधव, चिकन व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष जाफर शेख, रफिक सय्यद, मोबीज शेख उपस्थित होते.

पहा लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा डान्स असा झाला...

कदम म्हणाले, राज्यात कुक्कुट पालन व्यवसायांशी लाखोंच्या संख्येने शेतकरी बांधव संबंधित आहेत. अनेकांच्या अर्थार्जन व चरितार्थाचे ते मूळ साधन आहे. सध्या चुकीची माहिती पसरल्याने हा व्यवसाय धोक्यात आला आहे. चिकन व त्यासंबंधीच्या उत्पादनांचा नोव्हेल कोरोना विषाणूशी कोणताही संबंध नाही. चिकन सेवन करणे आणि त्याचा मानवीय आहारामध्ये वापर करणे पूर्णपणे सुरक्षित असून नागरिकांनी अशा प्रकारच्या अफवांकडे दुर्लक्ष्य करावे.

याच उड्डाणपुलावर थांबतात वाहनचालक लघुशंकेसाठी

नोव्हेल कोरोना विषाणू हा सांसर्गिक असून एका व्यक्तींकडून दुसऱ्या व्यक्तीस संक्रमित होतो. कुक्कुट पक्षामधील कोरोना विषाणू मानवांमध्ये संक्रमित होत नसल्याबाबत संदर्भ आहेत. आपल्याकडे चिकन व मटण उकळून, शिजवून याचे सेवन केले जाते. त्या तापमानात कुठलेही विषाणू जिवंत राहू शकत नाहीत, असेही डॉ. कदम यांनी सांगितले.

पोलिस अधिक्षकांना निवेदन

चीनमधून भारतात पोल्ट्री व्यवसायांशी संबंधित कोणतीही देवाण-घेवाण होत नाही. अशा प्रकारच्या खोडसाळ पोस्ट सोशल मिडीयावर टाकणाऱ्या व्यक्तींवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी पोल्ट्री व्यावसायिक व चिकन विक्रेत्यांच्या वतीने पोलीस अधीक्षकांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. जाधव यांनी या वेळी दिली. 

व्यवसाय आर्थिक संकटात 

सोशल मिडियावरील चुकीच्या पोस्टमुळे शहर व जिल्ह्यातील चिकन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. नेहमी दैनंदिन १० ते १२ टन चिकनची मागणी लातूर शहरात तर जिल्हाभरात साधारणतः ३० ते ३२ टन चिकनची विक्री होते. मात्र, सध्य:स्थितीत ही मागणी ५० ते ६० टक्क्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे चिकन व्यवसाय आर्थिक संकटात सापडला आहे, असे चिकन व्यावसायिकांनी या वेळी सांगितले.

शिवसेनेच्या आमदाराला आली मंत्रालयात चक्कर

loading image
go to top