esakal | Lockdown : मध्य प्रदेशातील मजूर निघाले पायी
sakal

बोलून बातमी शोधा

Situation of Lockdown In Jalna District


पोलिसांनी कंत्राटदारांकडे केली राहण्याची, जेवणाची सोय 

Lockdown : मध्य प्रदेशातील मजूर निघाले पायी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

घनसावंगी (जि. जालना) - मोसंबी तोडण्यासाठी मध्य प्रदेशातून आलेले मजूर त्यांच्या गावी जाण्यासाठी चक्क पायी निघाले. दरम्यान, पोलिसांनी अडवून त्यांची चहा व नाश्‍त्याची सोय केली. शिवाय लॉकडाऊन संपेपर्यंत कंत्राटदारांकडे त्यांच्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था करण्यात आली. 

परराज्यांतील मजूर घनसावंगी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विहीर, रस्त्यांची कामे, शेतातील मजूर, मोसंबी तोडण्यांसाठी काम करीत असतात. असे जवळपास दहा हजारांवर मजूर तालुक्याच्या ग्रामीण भागात काम करीत आहेत. अंबड येथील ठेकेदारांकडे मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यातील शिरपूर गावातील वीस मजूर मोसंबी तोडण्याचे काम करीत होते. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे काम बंद पडले.

- धक्कादायक:  कामगारांना केमिकलयुक्त पाण्याने घातली आंघोळ; योगी सरकारवर टीकेचा भडीमार!

त्याचबरोबर या विषाणूच्या रोगांपासून उद्‍भवणाऱ्या परिस्थितीमुळे हे मजूर धास्तावले; तसेच मध्य प्रदेशातील घरातील कुटुंबीय व नातेवाइकांच्याही जिवाचा घोर त्यांना लागला. त्यामुळे मजुरांनी आपल्या गावी परतण्याचा निर्णय घेतला; परंतु राज्यातील संचारबंदीमुळे रेल्वे, खासगी वाहतूक बंद आहे. त्यामुळे या मजुरांनी आपल्या गावी जाण्यासाठी पायी जाण्याचा निर्णय घेतला. यासाठी यासंबंधी त्यांचे ठेकेदार अमजद गफार बागवान (रा. अंबड) यांनी त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी ऐकण्यास नकार दिल्याने त्यांनी बोधलापुरी (ता. घनसावंगी) येथील मोसंबी तोडणीचे काम संपल्यानंतर हे मजूर रात्री पायी निघाले. पुढे जसा मार्ग सापडेल त्याप्रमाणे पुढे चालण्याचा त्यांचा प्रयत्न होता; मात्र घनसावंगी पोलिसांनी त्यांना रस्त्यांवर आडवून पोलिस ठाण्यात आणले.

पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवार यांनी त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला; पण मजूर ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने त्यांनी पोलिस खाक्या दाखविल्यानंतर मजुरांनी शांत राहण्याची भूमिका घेतली. त्यानंतर संबंधित ठेकेदार अमजद पठाण यांना बोलावून घेऊन त्यांच्या राहण्याबरोबरच जेवणाची सोय करण्याच्या सूचना दिल्या. राज्यातील लॉकडाऊन संपल्यानंतर गावी परतण्यासाठी परवानगी देण्यात येईल, असे सांगितल्यानंतर मजूर शांत झाले. त्यानंतर एका वाहनाद्वारे त्यांची बोधलापुरी येथे रवानगी करण्यात आली.  दरम्यान, पोलिसांनी या मजुरांच्या चहा व नाश्‍त्याची सोय केली. यावेळी नगराध्यक्षा प्राजक्ता देशमुख, राज देशमुख,नगरसेवक बापूराव देशमुख, विलास गायकवाड, कैलास पवार, पोलिस उपनिरीक्षक मनोहर खिळदकर, महासिंग घुसिंगे, मधुकर पाटील, श्री. पवार,नगरपंचायतीचे कर्मचारी ज्ञानेश्‍वर सोमवारे, राजू वजीर, श्री. सोमवारे, शेख महेबूब यांची उपस्थिती होती. 
  
मजुरांना कामावर राहण्याच्या सूचना 
शिवाजी बंटेवार (पोलिस निरीक्षक, घनसावंगी) : कोरोना विषाणूच्या भीतीने हे मजूर आपल्या गावी परतण्यासाठी पायीच निघाले होते. त्यांच्या राहण्याची व जेवणाची सोय व त्या ठिकाणी वास्तव्यास ठेवण्याच्या सूचना ठेकेदारांना दिल्या आहेत. लॉकडाऊन संपताच परराज्यांतील मजुरांना त्यांच्या गावी जाण्याची परवानगी देण्यात येईल. तोपर्यंत ज्या ठिकाणी ते काम करीत होते तेथेच त्यांनी राहावे, अशी सूचना केल्या आहेत. 
  
गैरसोय होऊ देणार नाही 
अमजद गफार बागवान (ठेकेदार, अंबड) : मध्य प्रदेशातील मजूर आमच्याकडे मोसंबी तोडणीचे काम करीत होते. काम जरी बंद झाले तरी त्यांच्या राहण्याची व जेवणाची सोय आम्ही केली होती; परंतु मजूर ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने त्यांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना आता येथेच थांबविले जाणार असून, त्यांची गैरसोय होऊ दिली जाणार नाही. 
 

घराकडे जाण्याची ओढ 
अंकुशनगर ः
ग्रामीण भागात अडकलेले परराज्यांतील युवक आपले घर गाठण्यासाठी उत्तराखंड, राजस्थान राज्यांत पायी प्रवास करीत आहेत. असंख्य संकटांना सामोरे जात उपाशीपोटी घरी जाण्याचा ओढीने त्याची पायपीट सुरू आहे. प्रशासनाने या युवकांकडे लक्ष देऊन त्यांच्या अन्न आणि निवाऱ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे. 

loading image