मंडप कोसळून सहा निवडणूक प्रशिक्षणार्थीं जखमी

रामदास साबळे
रविवार, 7 एप्रिल 2019

लोकसभा निवडणुकीच्या प्रशिक्षणासाठी उभारलेला मंडप कोसळून लोखंडी खांब डोक्यात पडून तीन महिलांसह सहा कर्मचारी जखमी झाल्याची घटना रविवारी (ता. 7) घडली.

केज : लोकसभा निवडणुकीच्या प्रशिक्षणासाठी उभारलेला मंडप कोसळून लोखंडी खांब डोक्यात पडून तीन महिलांसह सहा कर्मचारी जखमी झाल्याची घटना रविवारी (ता. 7) घडली. जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ निहाय निवडणूक प्रक्रियेसाठी रविवारी कर्मचारी प्रशिक्षण सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शोभा जाधव यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आले होते.

लोकसभा निवडणुकीचे दुसरे प्रशिक्षण शहरातील वसंत महाविद्यालयात चालू आहे. या प्रशिक्षणासाठी दोन हजार कर्मचारी सहभागी झाले होते. प्रशिक्षणासाठी आलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रथम प्रशिक्षणासाठी मंडप उभारण्यात आला होता. अचानक वादळी वारे (वावटळ) मंडपात घुसल्याने मंडप उडून खाली पडला.

मंडपासाठी वापरण्यात आलेले लोखंडी खांब अंगावर पडल्याने यामध्ये उमेदा बेगम पठाण (वय 38), स्नेहा हरिदास बर्दापुरे (वय 30), उमेंश फिरोज शेख (वय 26), हासमीन सुलतान समशोद्दीन (वय 40 ), सायरा चाऊशी (वय 40), खाजिया खिरा  (वय 50) हे सर्व राहणार अंबाजोगाई हे सहा प्रशिक्षणार्थी कर्मचारी जखमी झाले आहेत. निवडणूक प्रशिक्षणासाठी उभारलेला मंडप कोसळून यात कर्मचारी जखमी झाले.  जखमी प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी दिली आहे.

निवडणूक विभागाचे प्रशिक्षणार्थींच्या सुविधांकडे दुर्लक्ष
शहरातील वसंत महाविद्यालयात लोकसभा निवडणूकीचे प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यासाठी उभारण्यात आलेल्या मंडपाच्या सुरक्षिततेची तपासणी किंवा पाहणी करण्यात आली नव्हती. प्रशिक्षणार्थी मंडपात प्रशिक्षण घेत असताना आलेल्या आलेल्या वावटळीने मंडप कोसळला. यावेळी ठेवण्यात आलेल्या चहा व फराळाच्यावेळी गैरसोय झाल्याची कर्मचाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा होती.

Web Title: six election trainee injured due to collapse pavilion