सव्वादोनशे प्रकल्पांत सहाच टक्के पाणी!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

उस्मानाबाद जिल्ह्यातील चित्र ः गेल्यावर्षीपेक्षा साठा अजूनही कमीच 

उस्मानाबाद : पावसाचा रुसवाच असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात सरतेवेळी का होईना गेल्या 15 दिवसांपासून अधूनमधून होणाऱ्या पावसाने जिल्ह्यातील काही धरणांचा पाणीसाठा किंचित वाढला आहे. एकूण पाणीसाठा सहा टक्‍क्‍यांवर पोचला आहे. असे असले तरी गेल्यावर्षीपेक्षा हा साठा कमीच आहे. जिल्ह्यातील एकूण 223 प्रकल्पांत गेल्यावर्षी याच दिवसापर्यंत सरासरी तेरा टक्के साठा होता. अजूनही बहुतांश प्रकल्प कोरडे असून मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांत पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली आहे. लोहारा, तुळजापूर, उमरगा वगळता इतर तालुक्‍यांत मात्र पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. आठपैकी पाच तालुक्‍यांतील प्रकल्प कोरडे आहेत. जिल्ह्यात एकूण मोठा एक, मध्यम 17 तर 205 लघू असे 223 प्रकल्प आहेत. परंडा तालुक्‍यातील सीना-कोळेगाव हा मोठा प्रकल्प अजून कोरडाच आहे. 17 मध्यम प्रकल्पांचीही स्थिती अशीच आहे. या प्रकल्पात गेल्या आठवड्यात 1.10 टक्के एवढा पाणीसाठा होता. आता हाच पाणीसाठा 6.79 टक्‍क्‍यांवर आला आहे. दरम्यान, गेल्यावर्षी मात्र आतापर्यंत हाच पाणीसाठा तब्बल 19.21 टक्के एवढा होता. उस्मानाबाद, कळंब, भूम व परंडा या चार तालुक्‍यांत 11 मध्यम प्रकल्प आहेत. हे सर्वच प्रकल्प कोरडे आहेत. केवळ तुळजापूर आणि उमरगा तालुक्‍यातील प्रकल्पांमध्येच पाणीसाठा वाढला आहे. 17 प्रकल्पांचा उपयुक्त पाणीसाठा 202.84 दशलक्ष घनमीटर एवढा आहे. प्रत्यक्षात या प्रकल्पांत 13.77 दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा झाला आहे. 

पाणीसाठ्यात किंचित वाढ 
जिल्ह्यात 205 लघुप्रकल्पांची 421 दशलक्ष घनमीटर एवढी साठवण क्षमता आहे. सध्या यामध्ये 28.35 दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा झाला आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात पाणीसाठ्यात 5.45 टक्के एवढी वाढ झाली आहे. गेल्या 15 दिवसांत जिल्ह्यात पाऊस झाला असला, तरी मोठा पाऊस झालेला नसल्याने पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. 

टंचाईची टांगती तलवार 
जिल्ह्यातील एकूण 223 प्रकल्प आहेत. त्यातील 76 प्रकल्प कोरडेच आहेत. 94 प्रकल्पाची पाणीपातळी ज्योत्याखाली आहे. 31 प्रकल्पांत 25 टक्‍क्‍यांपेक्षा कमी भरले आहेत. गेल्यावर्षी सर्व प्रकल्पांत आतापर्यंतचा सरासरी पाणीसाठा 13.42 टक्के एवढा होता. सध्या केवळ 6.1 टक्के एवढा असल्याने अजूनही टंचाईचे संकट दुरावलेले नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six percent water