औशातील सहा युवकांनी उभी केलेली 'माणुसकीची भिंत' देतेय गरजूंना आधार

जलील पठाण
Friday, 11 December 2020

कपडे, ब्लॅंकेट नको असलेले कपडे गोळा करून गरजूंना वाटप केले जात आहे.

औसा (जि. लातूर): समाजासाठी कांही चांगलं करायचं ठरविल्यावर बरंच काही करता येतं. तेही अगदी मोफत आणि सर्वांच्या सहकार्याने. अशाच ध्येयाने प्रेरित झालेले वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे सहा तरुण एकत्र येतात आणि औसा शहरातील लोकांना आवाहन करतात की, तुमच्याकडे वापरात नसलेले कपडे, चादर, साड्या आम्हाला द्या आम्ही ते गरजूंना देऊ... आणि हळू हळू कपड्यांचा ढीग लागतो आणि ते कपडे गरजू लोकांपर्यंत पोहचतात.

यातून एक शिकायला मिळतं की, आपण सारं काही करू शकतो फक्त त्यासाठी पुढाकार कोण घ्यायचा यामध्ये बऱ्याचदा द्विदावस्था असते. पण औशातील सहा तरुणांनी पुढाकार घेतला आणि उभी केली माणुसकीची भिंत... ही भिंतच आता गरजूंची गरज भागवत आहे.

साखरपुड्यात होणारा बालविवाह रोखला, जाफराबाद पोलिसांची सजगता

शहरातील युवराज कसबे, सचिन पवार, समीर शिंदे, पवन कांबळे, महेश कसबे आणि शुभम जोगदंड या सहा तरुणांनी थंडीत, फाटक्या आणि मळकट कपड्यांनी वावरणारी गरीब लोकं पहिली. ही सर्व मंडळी आपापल्या कामात खूप व्यस्त असतात. मात्र या लोकांसाठी आपण काय करू शकतो का? याचा विचार सुरू झाला आणि त्यांच्या डोक्यात पुण्यासारख्या शहरात गरीब आणि गरजू लोकांसाठी जुने वापरात नसलेले कपडे आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी जुने चादर, ब्लॅंकेट घराघरातून मागून आणून ते गरजूंना उपलब्ध करून देऊन त्यांची गरज भागत असलेला किस्सा आठवला आणि त्यांनी सोशल मीडियावर शहर आणि परिसरातील लोकांना आवाहन केले की ' नको असलेले द्या, हवे असलेले घेऊन जा' लोकांनी घरात वापरात नसलेले कपडे देण्याची विनंती केली.

बीडमध्ये जोगदंडचे दर्जाहिन कामे अन् राष्ट्रवादीतील धुसफुसही चव्हाट्यावर

बसस्थानकात एका भिंतीला फळ्या ठोकून तेथे लोकांनी दिलेले कपडे लहानाचे वेगळे, मोठे वेगळे आणि महिलांचे वेगळे असे तीन विभाग करण्यात आले. गरजू येऊन त्यांच्या साईजचे आणि त्यांना आवडलेले कपडे घेऊन चालले. जर कोणाला हे कपडे भिंतीपर्यंत आणणे जमत नसेल तर त्यांनी फोन केला तरी घरापर्यंत जाऊन ते संकलन केले जाते. आता रोज ही भिंत कपड्यांनी भरते आणि ती रिकामीही होत आहे. एरव्ही फाटक्या आणि मळकट कपड्यात फिरणारी भटकी व गरीब मंडळी स्वच्छ आणि नीटनेटक्या पेहरावात दिसू लागली आहेत. या सहा तरुणांनी उभी केलेली माणुसकीची भिंत आता या गरीब व गरजू लोकांचा आधार बनत आहे.

समाजासाठी काही करायचे ठरवले तर अगदी विनामुल्यही आपण सेवा करू शकतो. फक्त त्यासाठी हवी ती इच्छाशक्ती आणि ती आम्ही निर्माण केली. सकाळी भरलेली भिंत रिकामी होत आहे हे पाहून खरंच मनाला खूप आत्मिक समाधान मिळते. यानंतरही आम्ही अजून काय करू शकतो का याचा विचार आम्ही करीत आहोत. लोकांकडूनही यासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे -युवराज कसबे

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six youth in Ausa give support needy through manuskichi bhint