स्मार्ट बससाठी ओसाड थांबे!

Bus-Stop
Bus-Stop

औरंगाबाद - स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहर बससेवेचा प्रारंभ करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी तारीख जाहीर करून तयारीही सुरू केली आहे. दुसरीकडे मात्र सध्या अस्तित्वात असलेल्या ५७ पैकी बहुतांश बसथांब्यांची दुरवस्था झाली असून, साधी साफसफाईदेखील सुरू नाही. बसथांब्यांचे नूतनीकरण एमएसअंतर्गत करण्यात येणार आहे. मात्र, या निविदा अद्याप अंतिम झालेल्या नाहीत. त्यामुळे स्मार्ट बससाठी ओसाड थांब्यांवर प्रवाशांना थांबावे लागणार आहे. 

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शंभर बस सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी वारंवार बससेवा सुरू करण्याच्या तारखा जाहीर केल्या. आता वर्षअखेरीस बससेवेचा प्रारंभ होण्याची आशा निर्माण झाली आहे. पुन्हा एकदा महापौरांनी २४ डिसेंबर ही तारीख जाहीर केली. त्यानुसार तयारी सुरू करण्यात आली आहे. कंपनीच्या बस प्राप्त होताच नारळही फोडला जाईल. मात्र, प्रवाशांच्या सोयीसाठी कुठलीही पाऊले उचलण्यात आली नाहीत.

प्रत्येक बसथांब्यावर वेळापत्रक, बस कोणत्या मार्गावर आहे, किती वेळात येईल याचे डिजिटल डिस्प्ले लावण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. डिजिटल बसथांबे दूरच; महापालिकेने अद्याप त्यांची धूळही झटकलेली नाही. अनेक ठिकाणच्या थांब्यांची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी निवाऱ्याचे पत्रे चोरीला गेले आहेत, काही ठिकाणी संपूर्ण बसथांबा मोडकळीस आल्याचे चित्र सध्या आहे. आगामी २५ दिवसांनंतर बस प्रत्यक्षात धावणार असल्याने बसथांब्यांची कामे कधी होणार, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

पर्यटन केंद्रामागे कार्यालय
महापालिकेने रेल्वेस्टेशनसमोर पर्यटन माहिती केंद्र सुरू केले आहे. या केंद्राच्या पाठीमागे मोठी जागा असून, या ठिकाणी शहर बससेवेचे कार्यालय सुरू केले जाणार आहे. 

ड्रेसकोड बदलणार 
शहर बस एसटी महामंडळामार्फत चालविली जाणार आहे. एसटीचेच कर्मचारी राहतील; मात्र ड्रेसकोड स्मार्ट सिटीचे संचालक मंडळ ठरविणार आहे. 

असे आहेत बसथांबे 
पहिला टप्पा 57
दुसरा टप्पा 150
अंतिम टप्पा 143

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com