आदर्श पोखरी गावाचा स्मार्ट कारभार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जानेवारी 2017

औरंगाबाद  - गावातील कारभारी, गावकऱ्यांच्या इच्छाशक्तीच्या जोरावर औरंगाबाद शहरापासून जवळ असलेल्या पोखरी गावाने स्मार्ट ग्राम, आदर्श ग्राम करण्याची किमया साधली आहे. येथील सुविधा, रस्ते, पाणी, शाळा, अंगणवाड्या, व्यायाम शाळा, पाळणा घर, मिनरल वॉटर प्लांट, वृक्षारोपण, पथदिवे शहराला लाजवतील असे आहेत. इतकेच नव्हे, तर संपूर्ण गावात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून ग्रामपंचायतीलाही कॉर्पोरेट लुक देण्यात आला आहे. गावात सुविधा निर्माण केल्याने येथील ग्रामस्था "गड्या आपला गाव बरा' असे म्हणतात. इतर गावांनाही आदर्श घेता येईल, असा विकास येथे झालेला पहायला मिळतो. 

औरंगाबाद  - गावातील कारभारी, गावकऱ्यांच्या इच्छाशक्तीच्या जोरावर औरंगाबाद शहरापासून जवळ असलेल्या पोखरी गावाने स्मार्ट ग्राम, आदर्श ग्राम करण्याची किमया साधली आहे. येथील सुविधा, रस्ते, पाणी, शाळा, अंगणवाड्या, व्यायाम शाळा, पाळणा घर, मिनरल वॉटर प्लांट, वृक्षारोपण, पथदिवे शहराला लाजवतील असे आहेत. इतकेच नव्हे, तर संपूर्ण गावात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून ग्रामपंचायतीलाही कॉर्पोरेट लुक देण्यात आला आहे. गावात सुविधा निर्माण केल्याने येथील ग्रामस्था "गड्या आपला गाव बरा' असे म्हणतात. इतर गावांनाही आदर्श घेता येईल, असा विकास येथे झालेला पहायला मिळतो. 

2007 मध्ये पाणंदमुक्त गाव 
शहरापासून जवळ असलेल्या पोखरीची लोकसंख्या ही 2011च्या जनगणनेनुसार 1,293 आहे. गावातील प्रमुख व्यवसाय शेती असून येथे 569.39 हेक्‍टर शेती आहे. त्यातील 107.75 बागायती तर जिरायती शेती 352.24 हेक्‍टर आहे. ग्रामस्थांनी एकत्र येत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात भाग घेत गावाला 2007 मध्ये पाणंदमुक्त केले. 2006-07 मध्ये तत्कालीन सरपंच भाऊसाहेब मगरे यांनी दिवंगत राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते निर्मलग्राम पुरस्कार स्वीकारला होता. गावात एकूण घरे 260 असून यापैकी 38 घरांत शोषखड्डे आहेत. परसबागेसाठी सांडपाणी वापरणारी घरे 22 आहेत. गटारात सांडपाणी सोडणारी घरे 200 आहेत. सर्वच्या सर्व 260 कुटुंबात स्वच्छतागृहे आहेत. तसेच 12 सार्वजनिक स्वच्छतागृहांची व्यवस्था असल्याने आज गाव पाणंदमुक्त झाले आहे. 

गावातील शाळा, अंगणवाड्या,  ग्रामपंचायती झाल्या आयएसओ 
पोखरीत दोन अंगणवाड्या आहेत. दोन्ही अंगणवाड्या आयएसओ आहेत. येथील अंगणवाड्यात स्वच्छतागृहांसह दर्जेदार सुविधा देण्यात आल्या आहे. जिल्हा परिषद शाळा आयएसओ आहे. शाळा आणि अंगणवाड्यांचा परिसर स्वच्छ आणि सुंदर करण्यात आलेला आहे. येथे प्रत्येक आठवड्याला नवनवीन उपक्रम घेतले जातात. 

गावात कमालीची स्वच्छता 
गावात 260 घरे असून यात ओला कचरा आणि सुका कचरा टाकण्यासाठी वैयक्तिक कचरा पेट्या देण्यात आलेल्या आहेत. येथे ओला सुका कचरा तसेच पर्यावरण कापडी पिशवी देण्यात आलेला आहे कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते. गावातील सर्व रस्ते सिमेंट आणि पेव्हर ब्लॉकचे असल्याने त्यावर सर्वत्र स्वच्छता दिसते. कचरा वाहून नेण्यासाठी ट्रॅक्‍टरची व्यवस्था करण्यात आली आहे. कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार केले जाते. 

गावात व्यायाम शाळा, सौर दिवे 
गावातील तरुणांसाठी व्यायाम शाळा तयार करण्यात आली आहे. विजेची बचत करण्यासाठी गावात सौर दिवे लावण्यात आले आहेत. गावात दुतर्फा झाडे लावण्यात आलेली आहेत. येथील 12 एकर गायरान जागेत ग्रामपंचायतीने दहा हजार वृक्षारोपण केले आहे. गावात जी व्यक्ती कर भरते त्यासाठी मोफत पिठाच्या गिरणीची व्यवस्था केली आहे. गावामध्ये शुद्ध पेयजल मिळावे, यासाठी मिनरल वॉटर प्लान्ट टाकण्यात आलेला आहे. अभ्यासिका, वाचनालय ाहे. गावात स्वतंत्र माहेरघर तयार करण्यात आले आहे. नवीन पद्धतीच्या कचरा कुंड्या तयार केल्या आहेत. या सर्व व्यवस्थेमुळे पोखरी गावाला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळविला. शिवाय शाहू, फुले, आंबेडकर दलित वस्ती विकास अभियानात सुद्धा तालुक्‍यातून प्रथम क्रमांक मिळाला. 

गावात सीसीटीव्ही कॅमेरे 
गावात देखरेख करण्यासाठी गावात एकूण 16 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यापैकी सध्या 8 कॅमेरे बसविले आहेत. शाळा, अंगनवाडी सुद्धा सीसीटीव्हीच्या टप्प्यात आहे. 

गावात नो तंटा 
गावात तंटामुक्त समिती तसेच विविध समित्या स्थापन केल्या आहेत. मात्र, गावात कोणताही तंटा नाही. इतकेच नव्हे तर नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गावात पहिल्यांदाच निवडणूक बिनविरोध करून सरपंच, उपसरपंचाची निवडणूकही बिनविरोध करण्यात आली आहे. येथे कधी जातीय तंटा, वाद झालेले नाही हे विशेष. 

गावात सर्व सुविधांसाठी प्रयत्न 
अमोल काकडे (सरपंच, पोखरी) ः गावात अनेक नवनवीन प्रयोग राबवून आम्ही गावात सुविधा निर्माण केल्या आहेत. आता आणखी नवीन काय करता येईल, यासाठी प्रयत्न करत आहोत. सध्या गावाचा पूर्णतः कायापालट झालेला आहे. आहे त्या सुविधा आणखी दर्जेदार पद्धतीने देण्यावर आमचा भर आहे. 

लोकचळवळीला यश 
सुनील हरणे (माजी पंचायत समिती सभापती) ः गाव आदर्श करण्याचा सर्वांनीच निर्णय घेतला होता. आम्ही त्याचे निमित्तमात्र ठरलो. सर्वांच्या सहकार्याने गावाचा विकास साध्य करता आला. गाव आदर्श करण्यासाठी आम्ही लोकचळवळ उभी केली. एका वर्षात आम्ही गावाचा पूर्ण कायपालाट करून टाकला. यासाठी सर्वांचे प्रयत्न कामी आले. 

Web Title: Smart management model pokhari village