ग्रामीण भागातही सोशल डिस्टन्सिंग, ग्राहकांचा प्रतिसाद 

राहुल किर्दंत
Saturday, 28 March 2020

जवळगाव येथील सेवा सहकारी सोसायटीअंतर्गत सुरू असलेल्या स्वस्त धान्य दुकानचालकाने ग्राहकांसाठी ठराविक ठिकाणी जागा आखून सोशल डिस्टन्स ठेवण्याची सक्ती केली आहे.

जवळगाव (जि. बीड) -  संचारबंदीच्या कालावधीत स्वस्त धान्य दुकानात गर्दी वाढत आहे. मात्र, अशावेळी कोणत्याही प्रकारचा संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेता जवळगाव येथील सेवा सहकारी सोसायटीअंतर्गत सुरू असलेल्या स्वस्त धान्य दुकानचालकाने ग्राहकांसाठी ठराविक ठिकाणी जागा आखून सोशल डिस्टन्स ठेवण्याची सक्ती केली आहे. यासंदर्भात ग्राहकांनाही याविषयी मार्गदर्शन करत आहेत. संसर्गजन्य कोरोना व्हायरस हद्दपार करण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक सोशल डिस्टन्सिंगला प्रतिसाद देत आहेत. 

संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे. सातत्याने प्रशासनाकडून आव्हान करूनही नागरिकाकडून गांभीर्याची दखल घेतली जात नसल्याने प्रशासनाने स्वस्त दुकानासह औषधालये, किराणा, बँक, पेट्रोल पंप, भाजीपाला, दूध डेअरी या दुकानासमोर वर्तुळे चौकोन टाकण्याचे आदेश दुकानदारांना दिले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने अनेक प्रकारचे उपाय केले आहे.

हेही वाचा - कोंबड्यांमध्ये खरंच कोरोना विषाणू आहे का? नॉनव्हेजवाल्यानो, वाचा...

सध्या शहरासह ग्रामीण भागात ही संचारबंदी सुरू आहे. मात्र अत्यावश्यक सेवा सुरू असून, त्यात किराणा दुकाने, भाजीपाला, दूध डेअरी, औषधालये, बँका आणि पेट्रोल पंपांचा समावेश आहे. स्वस्त धान्य दुकानासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध लागू केले असून, ठराविक अंतरातच ग्राहक राहतील, असे निर्देश आहेत. मात्र, त्यानंतरदेखील अनेक ठिकाणी काळजी घेत नसल्याचे दिसून आले. धान्य खरेदीस येणाऱ्या ग्राहकांना ठिकाणे निश्चित करून दिली आहेत. प्रत्येक ग्राहकामधील अंतर तीन फूटपेक्षा अधिक करण्यात आले आहे. जेणेकरून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखता येईल, या अनुषंगाने हे नियोजन करण्यात आले आहे. असे हनुमंत नाकुरे यांनी सांगितले. 

दूरचित्रवाणी, सोशल मीडियावर नागरिक जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना गर्दी करत असताना दिसत आहेत. कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्स पाळावा, त्यामुळे इतरांना कोरोना आजार होणार नाही. आम्ही पाळतो, तुम्ही पाळा. 
-रंगनाथ हारे, नागरिक, जवळगाव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Social Distance in rural areas too