छायाचित्रातून द्यावा सामाजिक संदेश

छायाचित्रातून द्यावा सामाजिक संदेश

बीड - पारंपरिक छायाचित्र कलेच्या माध्यमातून समाजातील बऱ्यावाईट घटना टिपतानाच हे प्रभावी माध्यम सामाजिक संदेश देण्यासाठीसुध्दा वापरले जावे, असे प्रतिपादन बीडचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.

जिल्हा माहिती कार्यालयातर्फे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या सभागृहात शुक्रवारी (ता.२४) भरविण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र माझा’ या छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सीईओ नामदेव ननावरे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ आणि ज्येष्ठ छायाचित्रकार विश्वनाथ माणूसमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘महाराष्ट्र माझा’ या छायाचित्र प्रदर्शनाच्या उपक्रमाबद्दल कौतुक करून जिल्हाधिकारी राम म्हणाले की, मोबाईलमधून सेल्फी किंवा फोटो घेणे म्हणजे फोटोग्राफी नाही. त्यासाठी उत्तमोत्तम कॅमेरा, साधने आणि घटनेकडे पाहण्याचा नेमका दृष्टिकोन असणे गरजेचे आहे. शासनाच्या विविध योजनांच्या विकासकामांची काही छायाचित्रे प्रदर्शनात समाविष्ट असून त्याबद्दल बोलताना जिल्हाधिकारी राम म्हणाले की, शासकीय योजनांच्या अंमलबजावणीची छायाचित्रे ही त्याचे महत्व अधोरेखित करणारी आहेत. जलयुक्त शिवार, स्वच्छ महाराष्ट्र यासारख्या लोकाभिमुख योजनांची राज्यातील प्रगती अत्यंत समाधानकारक आहे. त्याचेही प्रतिबिंब या प्रदर्शनाच्या माध्यमातून समोर आले आहे. याबरोबरच पुरोगामी महाराष्ट्राच्या विविध कला, संस्कृती, परंपरा, धार्मिक वास्तू तसेच सामाजिक संदेश देणारी छायाचित्रे म्हणजे रसिकांसाठी पर्वणी असल्याचेही जिल्हाधिकारी राम म्हणाले.

यावेळी ज्येष्ठ छायाचित्रकार विश्वनाथ माणूसमारे यांनी १९७२ च्या बीड जिल्ह्यातील दुष्काळाच्या प्रसंगाची छायाचित्रे काढल्याची आठवण सांगत जुन्या काळातील कृष्णधवल छायाचित्रीकरणाच्या आपल्या आठवणी सांगितल्या. जुन्या काळात अपुऱ्या साधनसामग्रीच्या आधारे अचूक फोटोग्राफी करण्याचे आव्हान आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात फारसे राहिले नाही, असे सांगत त्यांनी छायाचित्रण कलेच्या क्षेत्रात झालेल्या अभूतपूर्व प्रगतीची माहिती देत छायाचित्रांचे महत्व विशद केले. जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलूरकर यांनी प्रास्ताविक केले. उच्चस्तरीय छायाचित्रकारांच्या समितीने प्रदर्शनासाठी निवडलेली तब्बल १९० छायाचित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. महाराष्ट्राची कला-संस्कृती टिपलेल्या या छायाचित्रांना पाहण्याची संधी बीड जिल्ह्यातील जनतेला उपलब्ध करून दिली असून २ एप्रिलपर्यंत हे प्रदर्शन सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत खुले राहणार असल्याचेही ते म्हणाले. अमोल मुळे यांनी सूत्रसंचालन केले. राजेश लाबडे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी जिल्हा माहिती कार्यालयाचे शिवाजी गमे, मिलिंद तुपसमिंद्रे, शेख रईस, भगवान ढाकरे, छगन कांडेकर, श्रीमती लता कारंडे यांनी पुढाकार घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com