हिंगोली जिल्ह्यात निवडणुकीच्या बंदोबस्तावर असताना जवानाचा ह्रदयविकाराने मृत्यू

संजय कापसे
Friday, 15 January 2021

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तावर असलेल्या गृहरक्षक दलाच्या जवानाचा हृदयविकाराने शुक्रवारी (ता.१५) उपचारादरम्यान मृत्यू झाला.  

कळमनुरी (जि.हिंगोली) : जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान सुरु झाले आहे. दरम्यान या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तावर असलेल्या गृहरक्षक दलाच्या जवानाचा हृदयविकाराने शुक्रवारी (ता.१५) उपचारादरम्यान मृत्यू झाला.  

कळमनुरी येथील गृहरक्षक दलाच्या कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या मसोड येथील सुमेध गोमाजी मोगले (वय ३८) हे आपली गावाकडील शेती सांभाळून गृहरक्षक दलाच्या सेवेत कार्यरत होते. मागील एक महिन्यापूर्वी त्यांना कोविड आजाराच्या पार्श्वभूमीवर बाळापूर येथे बंदोबस्तावर नेमणूक देण्यात आली होती. त्यानंतर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना निवडणूक कामी गुरुवारी (ता.१४) कळमनुरी येथे बोलावण्यात आले होते. 

हेही वाचा - पेट्रोलच्या दरामध्ये मध्येही...भारतात परभणी...! 

निवडणूक कार्यालयाकडून देण्यात आलेल्या ठिकाणी रवाना होण्यापूर्वी सुमेध मोगले यांना गुरुवारी  तहसील कार्यालयाच्या आवारात सकाळी हृदयविकाराचा त्रास सुरू झाला. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले. मात्र नांदेड येथूनही त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबादला घेवून जाण्याचा सल्ला वैद्यकिय अधिकाऱ्यांनी दिला. यादरम्यान उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.  सुमेध मोगले विवाहित असून त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा व आई-वडील असा परिवार आहे. त्यांच्या मूळ गावी मसोड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मराठवाड्यातील इतरही बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soldier Dies Of Heart Attack In Hingoli District Hingoli Soldier News