जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, वियोगातून भावाने पिले विष 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 January 2020

महेश तिडके यास सैन्यदलात भरती होण्याची प्रेरणा घरातून मिळाली. वडील यशवंत तिडके हे भारतीय सैन्यातून सेवानिवृत्त झाले असून, मोठा भाऊ श्रीनगर येथे सैन्यदलात सेवेत आहे.

घाटनांदूर (जि. बीड) : लाडझरी (ता.परळी) येथील भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेल्या जवान महेश यशवंत तिडके (वय 23) यांचे भटिंडा (पंजाब) येथे अपघाती निधन झाले. त्यांच्यावर गुरुवारी (ता.दोन) शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, महेश तिडके यांच्या मृत्यूच्या वियोगाने चुलत भावाने विष प्राशन केल्याची धक्कादायक घटनाही घडली आहे. नऊ महिन्यांपूर्वीच महेश यांचे लग्न झाले होते. त्यामुळे त्यांच्या पत्नीलाही मोठा धक्का बसला आहे. 

गेल्या चार वर्षांपूर्वी भारतीय सैन्यात दाखल झालेल्या महेश (वय 23) हा भटिंडा येथे सेवा बजवावून ता.19 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता दुचाकीहुन निवासस्थानाकडे जात होते. यावेळी दाट धुके असल्याने दुचाकीचा अंदाज न येऊन एका कारने त्यांना धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले होते.

हे नक्की वाचा - असं कुठं असतंय का राव?

त्यांच्यावर भटिंडा येथील सैनिक रुग्णालयात उपचार सुरू असताना ता.27 डिसेंबर रोजी महेश कोमात गेले व ता.30 डिसेंबर रोजी त्यांचे निधन झाले. 

गुरुवारी (ता.दोन) लाडझरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात महेश यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी पार्थिव देह ठेवण्यात आला होता. माजी राज्यमंत्री पंडिताव दौंड, उपजिल्हा अधिकारी गणेश महाडिक, तहसीलदार बिपीन पाटील, गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. 

वडील, भाऊ सैन्यात 

महेश तिडके यास सैन्यदलात भरती होण्याची प्रेरणा घरातून मिळाली. वडील यशवंत तिडके हे भारतीय सैन्यातून सेवानिवृत्त झाले असून, मोठा भाऊ श्रीनगर येथे सैन्यदलात सेवेत आहे. दहावी झाल्यानंतर महेश सैन्यात भरती झाला. त्यांचे नऊ महिन्यांपूर्वी लग्न झाले होते.

चुलत भावाला दुःख अनावर

महेश तिडके यांचे निधन झाल्याचे दुःख सहन न झाल्याने त्यांचे चुलत बंधू शंकर बळीराम तिडके याने शेतात फवारणीसाठी आणलेले कीटकनाशक प्राशन केले. शंकर तिडके यास अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

क्लिक करा - तोंडाला कपडा बांधून चोरांचा असा धुमाकूळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soldier Funeral News Parali Beed News