तुळजापूरला जाणाऱ्या रस्त्याचा काही भाग लागला कोसळू, वाहतूक झाली बंद

तानाजी जाधवर
Saturday, 22 August 2020

सांजा चौकातून तुळजापूरला जाणाऱ्या बाह्यवळण रस्त्याचा काही भाग कोसळत असल्याची गंभीर बाब शनिवारी (ता.२२ ) सकाळी नागरिकांच्या लक्षात आली. त्यामुळे परिसरातील वाहतुकीस मज्जाव केला असुन त्यानंतर तेथील वाहतुक बंद करण्यात आली आहे.

उस्मानाबाद : सांजा चौकातून तुळजापूरला जाणाऱ्या बाह्यवळण रस्त्याचा काही भाग कोसळत असल्याची गंभीर बाब शनिवारी (ता.२२ ) सकाळी नागरिकांच्या लक्षात आली. त्यामुळे परिसरातील वाहतुकीस मज्जाव केला असुन त्यानंतर तेथील वाहतुक बंद करण्यात आली आहे. साधारण एक ते दीड वर्षांपूर्वीच या रस्त्याच्या काम पुर्ण झाले होते. त्यानंतर अचानक अशा पद्धतीने काही भाग कोसळत असल्याने त्याची गुणवत्ता सर्वांच्या समोर आली आहे.

धुळे-सोलापुर महामार्गावरील सांजा चौकात उड्डाणपुल बांधण्यात आला होता. वर्षभरापूर्वी या रस्त्याचे काम पूर्णत्वास गेले. साहजिकच त्यामुळे परिसरातील नागरिकांची मोठी सोय निर्माण झाली होती. पण या कामाच्या बाबतीत सुरुवातीपासून अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. त्यात काही समस्या सोडविण्याचा प्रयत्न झाला असला तरी अजुनही काही समस्या तशाच आहेत, असे असतानाच बाह्यवळणावरील उड्डाणपुल खचण्यास सुरवात झाल्याची गंभीर बाब पाहायला मिळाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात १६१ जणांना कोरोना, चौघांचा मृत्यू

रस्ते पूर्ण नसतानाही टोल नाके सुरु करण्यात आले होते. रस्ते पूर्ण करताना अत्यंत घाई केल्याने त्याची गुणवत्ता राहिलेली नसल्याचे दिसून येत आहे. तुळजापुरला जाणाऱ्या रस्त्याच्या बाजुने वरचा भागातुन मोठे वाहन गेल्यास तेथून रस्त्याचा काही भाग खाली कोसळत असल्याचे लक्षात आले. नागरिकांनी तिथे जाऊन पाहणी केली तर तो भाग पूर्णतः कोसळण्याच्या स्थितीत असल्याचे पाहायला मिळाले. त्या भागातील राजदीप गायकवाड, इक्बाल शेख, बाबा शेख, राहुल मुसळे, प्रविण पवार, सोनु गायकवाड यांनी वाहने थांबविण्यास सुरवात केली.

वाहनधारकांना त्यानी पर्यायी रस्त्याने जाण्यास सांगितले. त्यानंतर आयआरबी कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी येऊन पाहणी करण्याची विनंती केली. त्यांनीही रस्त्याची पाहणी केल्याची माहिती या नागरिकांनी दिली. पण तूर्तास तरी तेथील वाहतूक थांबविण्यात आली असुन आता आयआरबी कंपनी त्याची डागडुजी करणार असली तरी इतक्या लवकर रस्त्याची दुरवस्था झाल्याने त्यांच्याविरोधात नागरिकांमधून संताप व्यक्त होताना दिसत आहे.

(संपादन - गणेश पिटेकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Some Portion Of Road Collapsing Tuljapur News