esakal | हिंगोलीत पहिल्याच पावसानंतर पेरणीला सुरवात
sakal

बोलून बातमी शोधा

hingoli photo

जिल्ह्यात शुक्रवारी पहाटेपर्यंत १९.८९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दोन दिवस पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीस सुरवात केली आहे. सध्या सोयाबीन पेरणीला पसंती दिली असून शुक्रवारी बहुतांश शेतकरी पेरणी करताना दिसून येत होते.

हिंगोलीत पहिल्याच पावसानंतर पेरणीला सुरवात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गिरगाव (जि. हिंगोली) : वसमत तालुक्यातील गिरगाव भागात गुरुवारी झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीस सुरवात केली आहे. या भागात जवळपास दोन हजार हेक्‍टरवर पेरणी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गिरगाव येथे दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसाने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे. गुरुवारी झालेल्या दमदार पावसाने येथे शेतकऱ्यांनी शुक्रवारपासून सोयाबीन पेरणी सुरू केली आहे. 

हेही वाचाCOVID-19 : हिंगोलीत नवे बारा रुग्ण; जिल्ह्यात पहिला बळी -

दोन हजार हेक्टरवर पेरणी होणार

गिरगावसह परजना, खाजमापूर वाडी, बोरगाव खुर्द, मुरुंबा, माळवटा सोमठाणा, पार्डी बुदुक, डिग्रस खुर्द आदी भागात पाऊस झाल्याने या भागातही शेतकरी पेरणीत मग्न दिसून येत आहेत. या भागात अंदाजे दोन हजार हेक्टरवर पेरणी होणार आहे.

दमदार पाऊस झाल्याने समाधान

शेतकऱ्यांनी मे महिन्यात मशागतीची कामे पूर्ण केली होती. त्‍यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी पाऊस होताच पेरणीच्या कामास लागले आहेत. या भागात दोन वेळा मध्यम स्‍वरूपाचा पाऊस पडला. परंतु, पेरणी योग्य पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी होते. आता दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

सोयाबीनचे क्षेत्र वाढणार

बहुतांश शेतकऱ्यांनी शुक्रवारी सोयाबीन पिकाची पेरणी केली. त्‍यासाठी बैलजोडीचा वापर केला. या भागात दर वर्षी मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची पेरणी होत असते. यावेळी हे क्षेत्र अंदाजे दोन हजार हेक्टरवर जाण्याची शक्यता असून यामुळे सोयाबीनचे क्षेत्र वाढणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

जिल्‍ह्यात १९.८९ मिलिमीटर पाऊस

हिंगोली : जिल्‍ह्यात मागील चोवीस तासांत शुक्रवारी (ता. १२) पहाटेपर्यंत १९.८९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सेनगाव तालुक्‍यातील साखरा मंडळात सर्वाधिक ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्‍ह्यात दोन दिवसांपासून पावसाचे आगमन झाले आहे. सर्वदूर पाऊस झाल्याने शेतकरी शेतीच्या कामात मग्न झाले आहेत. 

येथे क्लिक कराशिवसांब घेवारे यांना आंतरिक सुरक्षा पदक जाहीर -

हिंगोली तालुक्यात १२६.० मिलिमीटर पाऊस

दरम्यान, शुक्रवारी पहाटेपर्यंत १९.८९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये हिंगोली तालुक्यात एकूण १२६.० मिलिमीटर पाऊस झाला असून सरासरी १८.० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कळमनुरी तालुक्यात एकूण ७८.०, तर सरासरी १३.० मिलिमीटर पाऊस झाला आहे. सेनगाव एकूण २७०, तर सरासरी ४५.० मिलिमीटर, वसमत एकूण ५९.०, तर सरासरी ८.४३ मिलिमीटर तसेच औंढा एकूण ६०.०, तर सरासरी १५.० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

सर्वाधिक पाऊस साखरा मंडळात

मंडळनिहाय झालेला पाऊस पुढील प्रमाणे (मिलिमीटरमध्ये) हिंगोली १३.०, खांबाळा १४.०, माळहिवरा २१.०, सिरसम बुद्रुक २८.०, बासंबा १८.०, नरसी नामदेव १९.०, डिग्रस १३.०, कळमनुरी १९.०, नांदापूर १.०, आखाडा बाळापूर ३०.०, डोंगरकडा २२.०, वारंगाफाटा ४.०, वाकोडी २.०, सेनगाव ४०.०, गोरेगाव २०.०, आजेगाव ६२.०, साखरा ७५.०, हत्ता ८.०, वसमत ५.०, हट्टा ६.०, गिरगाव ७.०, कुरुंदा ५.०, टेभुर्णी १६.०, आंबा १२.०, हयातनगर ८.० औंढा १८.०, जवळा बाजार १५.०, येहळेगाव १५.०, साळणा १२.०.