esakal | सध्या पेरणी करावी की नाही? जाणून घ्या कृषी विभागाचं मत
sakal

बोलून बातमी शोधा

Osmanabad

सध्या पेरणी करावी की नाही? जाणून घ्या कृषी विभागाचं मत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद: जिल्ह्यात पावसाची धरसोड सुरू असल्याने आता पेरणी करावी की मोठ्या पावसाची वाट पाहावी, या द्विधा मनःस्थितीत शेतकरी आहेत. दरम्यान, पुरेसा पाऊस पडलेला नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. जिल्ह्यात पाऊस चांगलीच धरसोड करीत आहे. शनिवारी (ता. १२) तसेच रविवारी पहाटे जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. त्यानंतर पुन्हा एकदा पावसाने दांडी मारली. गेल्या वर्षी मृग नक्षत्रात पाऊस झाला होता. यंदा मृग नक्षत्राच्या पहिल्या तीन-चार दिवसांत पाऊस गूल झाला.

विशेष म्हणजे यंदा मे महिन्यात जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात मात्र पावसाने दांडी मारली. पुन्हा पाऊस गायब होईल, असे संकेत मिळत असताना मागच्या शनिवारी तसेच रविवारी पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. काही ठरावीक महसूल मंडळे वगळता जिल्ह्यात सर्वदूर चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, पुन्हा दोन दिवसांपासून पाऊस गायब झाल्याचे चित्र आहे.

हेही वाचा: एकमेकांच्या पायात पाय घालून राज्य सरकार पडेल- रावसाहेब दानवे

पावसाची धरसोड शेतकऱ्यांना पेरणीसाठी चांगलीच कोड्यात टाकत आहे. दरम्यान, कृषी विभागाने मात्र पेरणीची घाई न करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे. ८० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. पावसाचा खंड पडला तर दुबार पेरणी करावी लागेल. त्यासाठी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

शेतकऱ्यांची कोंडी
मृग नक्षत्रात चांगला पाऊस होऊन पेरणी झाली तर पीक जोमदार येते. शिवाय उत्पन्नातही चांगली वाढ होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मृग नक्षत्रातील पेरणीची अपेक्षा असते. त्यात शनिवारी आणि रविवारी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. जरी पाऊस झाला तरी जमिनीत फारसा ओलावा नाही. आतापर्यंत सरासरी ६५ ते ७५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. पेरणी करून पावसाने हुलकावणी दिली तर जमिनीतील ओलावा कमी होऊ शकतो. परिणामी, दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ शकते. अशी भीती शेतकऱ्यांना आहे. असे असले तरी काही शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. पाऊस पडेल या आशेवर शेतकरी पेरणीची कामे करीत आहेत, तर पाऊस पुन्हा गायब झाल्याने अनेक शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.

loading image