esakal | जालन्यात पावसाविना पेरण्या लांबणीवर, जलसाठ्यातही घट
sakal

बोलून बातमी शोधा

rain

जालन्यात पावसाविना पेरण्या लांबणीवर, जलसाठ्यातही घट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जालना: जिल्ह्यात रोहिण्या बरसल्या, पण गाढवावर स्वार होऊन आलेल्या मृग नक्षत्राने अद्याप तरी काहीसा अपेक्षा भंग केला आहे. मृग नक्षत्राचा गाढव जणू रुसला आहे. परिणामी पावसाविना पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. तर दुसरीकडे जिल्ह्यातील मध्यम व लघू प्रकल्पातील पाणीसाठा ही कमी झाल्याचे चित्र आहे. आजघडीला जिल्ह्यातील सात मध्यम व ५७ लघू प्रकल्पांमध्ये केवळ १४.७६ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

गतवर्षी जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच जोरदार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे जून महिन्याच्या अर्ध्यावर पेरणीचे निम्मे काम झाले होते, शिवाय जिल्ह्यातील मध्यम व लघू प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. परंतु, यंदा अद्यापि जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पेरण्या रखडल्या आहेत. तर दुसरीकडे जून महिन्यात जिल्ह्यातील सात मध्यम व ५७ लघू प्रकल्पांमध्ये केवळ १४.७६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. तर ३६ लघू प्रकल्पांची पाणी पातळी ही जोत्याखाली गेलेली आहे. विशेष म्हणजे सात मध्यम प्रकल्पांमध्ये ३१.०७ टक्के तर ५७ लघू प्रकल्पांमध्ये ८.१६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस कधी बरसतोय, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

हेही वाचा: औरंगाबादमध्ये पुढल्या दोन आठवड्यात ऑक्सिजन प्लांट सुरू होणार

शेतकरी अडचणीत
पाऊस लांबल्याने पेरणीचे कामे खोळंबल्याने शेतकरी चिंतेत आहे. आत्तापर्यंत झालेल्या अल्प पावसावर पेरा केल्यास पिकांची वाढ खुंटते. तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी पावसाच्या आसेवर धूळ पेरा केला तर बियाणे वाया जाते. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट येऊन ठेपते. परिणामी पुढील एक-दोन दिवसांमध्ये जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली नाही, तर पेरणीला उशीर झाल्याने पिकाच्या उत्पादनावर ही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

loading image