esakal | लातूरात सोयाबीनच्या दराची गगन भरारी
sakal

बोलून बातमी शोधा

soyabean

लातूरात सोयाबीनच्या दराची गगन भरारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लातूर: येथील लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात गेल्या काही महिन्यांपासून सोयाबीनच्या भावात कमालीची वाढ होत आहे. काही महिने सात ते साडे सात हजार रुपये स्थिर राहिलेल्या भावाने गेल्या काही दिवसांत मोठी उसळी घेतली आहे. यात सोमवारी (ता. २६) तर या भावाने गगनभरारीच घेतली. या बाजारात कमाल भाव नऊ हजार १४२ रुपये प्रती क्विंटलला राहिला तर सर्वसाधारण भाव नऊ हजार रुपये राहिला आहे. लातूर ही सोयाबीनची मोठी बाजारपेठ आहे. हंगाम सुरु असताना दररोज किमान ५० हजार क्विंटलची आवक येथील आडत बाजारात राहते. या वर्षी हंगामाच्या सुरवातीला चार ते साडे चार हजार रुपये क्विंटलला भाव मिळाला. त्यानंतर सोयाबीनच्या भावात सातत्याने वाढ होत गेली आहे.

काही महिने सात ते साडे सात हजार रुपये स्थिर भाव राहिला. त्यानंतर त्यातही वाढ होत गेली. सोमवारी तर या भावाने गगनभरारी घेतली. येथील आडत बाजारात सोयाबीनला कमाल भाव नऊ हजार १४१ रुपये प्रती क्विंटलला मिळाला आहे. किमान भाव सात हजार ८०० रुपये प्रती क्विंटल राहिला आहे. तर सर्वसाधारण भाव हा नऊ हजार रुपये प्रती क्विंटल राहिला. आतापर्यंत सोयाबीनला इतका भाव कधीच मिळालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनच्या पेंडीला मागणी वाढली आहे. त्यात आवक मोठी नाही त्याचा परिणाम सोयाबीनचे भाव वाढत चालले आहेत. येत्या दोन- तीन दिवसांत आणखी साडे नऊ हजार रुपये प्रती क्विंटलला भाव जाईल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. यांचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच होताना दिसत आहे.

हेही वाचा: PHOTOS: मुंबई-विजयवाडा महामार्गाच्या दर्जाहीन कामाचा सामान्यांना फटका

सध्या बाजारपेठेत पाच ते सहा हजार क्विंटल सोयाबीनची आवक आहे. गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या भावात मोठी तेजी दिसून येत आहे. सोमवारी तर सोयाबीनला प्रती क्विंटलला कमाल नऊ हजार १४२ रुपये भाव राहिला. आतापर्यंतचा हा सर्वात जास्त भाव आहे. ही तेजी कशामुळे होत आहे, हे समजून येत नाही. सध्या आवक कमी आहे. सोयाबीन मिळत नसल्याने अनेक प्लॅन्ट बंद आहेत. ज्या उद्योजकांचे तीन चार प्लॅन्ट आहेत, ते आता पन्नास टक्क्यांवर आले आहेत. चालू असलेले प्लॅन्टला हे सोयाबीन जात आहे.
-ललितभाई शहा, सभापती, लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती.

loading image
go to top