सोयाबीनचे कोठार काळवंडले

सोयाबीनचे कोठार काळवंडले

उस्मानाबाद - पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील सोयाबीनचे कोठार काळवंडले आहे. गेल्या २० दिवसांपासून पाऊस गायब झाला असून उन्हाचा चटका वाढल्याने सोयाबीन करपू लागले आहे. दरम्यान, विविध राजकीय पक्ष-संघटनांनी पंचनामे करण्याची मागणी केल्याने दुष्काळाचे ढग वाढत असल्याचे संकेत दिसत आहेत. 

जिल्ह्यात सरासरी तीन लाख ७२ हजार हेक्‍टरवर खरिपाची पेरणी होते. यंदा यातील सुमारे दोन लाख १५ हजार हेक्‍टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. विशेष म्हणजे पेरणी झाल्यापासून तब्बल २५ दिवसांचा पावसाचा खंड होता. त्यामुळे सोयाबीन पिकाची अपेक्षित वाढ झाली नाही; मात्र उन्हाचा चटका नसल्याने पिकावर फारसा परिणाम जाणवला नाही. त्यानंतर झालेल्या थोड्याफार पावसाने पिकांना जीवदान मिळाले. आता सोयाबीन शेंगा भरलेल्या स्थितीत आहे. त्यात उन्हाचा चटका तीव्र झाला आहे. त्यामुळे माळरानावर पिकांचा पाचोळा झाला आहे. तर काळ्या जमिनीतही पिकांनी माना टाकल्या आहेत. शनिवारी (ता. १६) जिल्ह्याच्या काही भागांत पाऊस झाला आहे; मात्र मोठ्या पावसाची गरज असून अपेक्षित पाऊस न झाल्यास पिकांच्या उत्पादनात मोठी घट येण्याची चिन्हे आहेत. 

दरम्यान, राज्यात भाजप-सेनेची सत्ता आहे. जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून सेनेचे अर्जुन खोतकर आहेत. पंचनामे करण्याचे आदेश देण्याचे काम त्यांच्याच अधिकारात आहेत. तरीही शिवसेना पंचनामे करण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देऊन नौटंकी करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून केला जात आहे. त्यामुळे पंचनामे कधी होणार, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

संघटनांची मागणी 
जिल्ह्यातून पाऊस गायब झाल्याने राजकीय पक्षांनी प्रशासनाकडे पंचनाम्याची मागणी केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, शेतकरी संघटना, जनता दल (एस), शेकापने पिकांचे पंचनामे करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने त्वरित पंचनामे सुरू न केल्यास आंदोलनाची हाक दिल्याने पुन्हा एकदा जिल्ह्यात आंदोलनाचा जोर दिसून येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com