बीडमध्ये पाच फॉगिंग मशीनद्वारे फवारणी 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 March 2020

बीड -  बीड नगरपालिकेमार्फत शहरात सोमवारपासून पाच फॉगिंग मशीनद्वारे फवारणी करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी दिली. 

बीड -  बीड नगरपालिकेमार्फत शहरात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सोमवारपासून (ता. ३०) शहरात पाच फॉगिंग मशीन दाखल होऊन त्याद्वारे फवारणी करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी दिली. 

शहरात नागरिकांची गर्दी होऊ नये, आजाराविषयी जनजागृती निर्माण व्हावी यासाठी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांच्यासमवेत शहरात फिरून आढावा घेतला. लोकांना सोशल डिस्टन्सिंगबाबत सूचना दिल्या. गर्दीमुळे नवीन भाजीमंडईतील भाजीबाजाराचे विकेंद्रीकरण केलेल्या ठिकाणांचीही त्यांनी पाहणी केली.

हेही वाचा - इस्लापूर येथून परतलेले मजूर विलगीकरण कक्षात

शहरातील विविध ठिकाणच्या स्वच्छतेबाबत त्यांनी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. बार्शी नाका, शिवाजीनगर गंज, भाजीमंडई, डॉ. आंबेडकर पुतळा, साठे चौक, पांगरी रोड या भागात त्यांनी पाहणी केली. अधीक्षक युवराज कदम, विभागप्रमुख भागवत जाधव, अग्निशमन अधिकारी धायतडक, अभियंता राहुल टाळके, मलेरिया विभागाचे श्री. पवार, स्वच्छता निरीक्षक श्री. जोगदंड, श्री. ओव्हाळ, श्री. चांदणे, श्री. गायकवाड, श्री. वंजारे आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Spray through five fogging machines in the Beed