SSC Result : लातूरचा निकाल 72.87 टक्के; मुलींनीच मारली बाजी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जून 2019

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत लातूर विभागीय मंडळाचा निकाल 72.87 टक्के निकाल लागला आहे.

लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत लातूर विभागीय मंडळाचा निकाल 72.87 टक्के निकाल लागला आहे. या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे, अशी माहिती विभागीय मंडळाचे अध्यक्ष महेश करजगावकर यांनी येथे दिली.

लातूर विभागीय मंडळात 1 लाख 7 हजार 291 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. या पैकी 78 हजार 187 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात विशेष प्राविण्यात 20 हजार २५ विद्यार्थी, अ श्रेणीत 29 हजार 624, ब श्रेणीत 23 हजार 269 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 5 हजार 269 विद्यार्थी पास झाले आहेत. निकालाची टक्केवारी 72.87 इतकी आहे. यात लातूर जिल्ह्याचा निकाल 78.66 टक्के लागला आहे. 39 हजार 766 पैकी 31 हजार 278 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्याचा निकाल 72.17 टक्के लागला आहे. या जिल्ह्यात 22 हजार 345 पैकी 16 हजार 127 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नांदेड जिल्हयाचा निकाल 68.13 टक्के लागला आहे. या जिल्ह्यात 45 हजार 180 पैकी 30 हजार 782 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती श्री. करजगावकर यांनी दिली.

लातूर विभागात 1 हजार 732 शाळातून विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. लातूर विभागात मुलींच्या निकालाची टक्केवारी 78.22 इतकी आहे, तर मुलांचा निकाल 68.35 टक्के इतका आहे. विभागात 49 हजार 973 पैकी 38 हजार 486 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर 59 हजार 195 पैकी 39 हजार 701 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

विभागात लातूर जिल्ह्याचा मुलींचा 83.64 तर मुलांचा 78.66 टक्के, उस्मानाबाद जिल्ह्याचा मुलींचा 79.50, तर मुलांचा 72.17 टक्के आणि नांदेड जिल्ह्याचा मुलींचा 73.15 टक्के, तर मुलांचा 63.14 टक्के निकाल लागला आहे. या विभागात शून्य ते दहा टक्केपर्यंतच्या 28, तर 10-20 टक्केपर्यंतच्या 21 शाळांचा निकाल आहे. या विभागात परीक्षा केंद्रावरील 45 व परीक्षेनंतरचे 25 असे 70 गैरप्रकार उघडकीस आले होते. यात दोघांची एक अधिक पाच, 42 जणांची एक अधिक एक तर तिघांची संबंधित विषयाची संपादणूक पातळी रद्द करण्याची शिक्षा देण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

या विभागात खेळाच्या गुणासाठी 1 हजार 985 प्रस्ताव आले होते. त्यापैकी 1 हजार 938 प्रस्ताव पात्र ठरले असून केवळ 47 प्रस्ताव अपात्र आहेत. चित्रकलेचे 6 हजार 247 प्रस्ताव आले होते. त्या पैकी 5 हजार 649 प्रस्ताव पात्र ठरले असून 598 प्रस्ताव अपात्र ठरले आहेत. लोककलेचे 160 पैकी 159 प्रस्ताव पात्र ठरले आहेत, अशी माहिती करजगावकर यांनी दिली. यावेळी मंडळाचे सचिव चित्तप्रकाश देशमुख, सहायक संचालक सुधाकर तेलंग, शिक्षणाधिकारी औदुंबर उकीरडे उपस्थित होते.

गतवर्षीच्या तुलनेत निकालात घट

गेल्या वर्षी लातूर विभागाचा निकाल 86.30 टक्के लागला होता. यावर्षी 72.87 टक्के निकाल लागला आहे. म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत 13.43 टक्केने निकाल कमी लागला आहे. परीक्षेचा पॅटर्न बदलल्याने हा निकाल कमी लागला आहे, अशी माहिती करजगावकर यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SSC result : Latur district scored 72.87 percentage