एसटीच्या कोट्यवधींच्या जागा धोक्‍यात 

अनिल जमधडे 
शुक्रवार, 5 जुलै 2019

एसटी महामंडळाच्या कोट्यवधी रुपयांच्या जागा राज्यभर आहेत. यातील शेकडो जागा रिकाम्या पडल्या आहेत.

औरंगाबाद - एसटी महामंडळाच्या कोट्यवधी रुपयांच्या जागा राज्यभर आहेत. यातील शेकडो जागा रिकाम्या पडल्या आहेत. अनेक जागा अतिक्रमणांच्या विळख्यात सापडल्या आहेत; तर काही बेवारस पडल्या आहेत. या जमिनीच्या विकासातून एसटीला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळू शकतो; मात्र त्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले जात नाहीत. परिणामी, एसटीच्या राज्यभरातील कोट्यवधी रुपयांच्या मोक्‍याच्या जागा धोक्‍यात आल्या आहेत. 

प्रवाशांच्या सेवेसाठी ब्रीद घेऊन निघालेल्या राज्य परिवहन महामंडळाचा सध्याचा पाच हजार 200 कोटी संचित तोटा आहे.2018-19 मध्ये एसटीला 965 कोटी रुपयांचा वार्षिक तोटा झालेला आहे. या तोट्यातून बाहेर काढण्यासाठी आणि एसटीची परिस्थिती सुधारण्यासाठी महामंडळाच्या मोक्‍याच्या जागांची मदत होऊ शकते. एसटीची सेवा ही लोकाभिमुख सेवा आहे. ना नफा - ना तोटा या तत्त्वावर ही सेवा महामंडळ पुरविण्याचा प्रयत्न करते; मात्र त्यासाठी राज्य सरकारकडून मिळणारे अपेक्षित अनुदान वेळेवर मिळत नाही. त्यामुळे एसटीची अडचण अधिकच वाढत आहे. अशा परिस्थितीत एसटीच्या मोक्‍याच्या जागा एसटीला सावरू शकतात. 

निर्णयाचा अभाव 
एसटीच्या मोखळ्या जागांवर व्यापारी संकुल अथवा व्यावसायिक उद्देशाचे बांधकाम करण्यासाठी धोरणात्मक निर्णयाची गरज आहे; मात्र असा निर्णय शासकीय पातळीवरून घेतला जात नाही, असे सूत्रांनी सांगितले. एसटीच्या राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्‍यांमध्ये आणि विविध मोठ्या गावांमध्येही मोक्‍याच्या ठिकाणी शेकडो जागा आहेत. महामंडळाची बसस्थानके, आगार सोडले तर अनेक ठिकाणी जागा ओस पडल्या आहेत. रिकाम्या पडलेल्या अनेक जागांवर अतिक्रमणे झाली आहेत. अनेक जागांचा उकिरडा झाला आहे. 

एसटी महामंडळाच्या जागा ताब्यात घेणे हा पहिला उद्देश आहे. गेल्या सत्तर वर्षांत न झालेले प्रयत्न मी केले आहेत. सध्या दीडशे जागांना वॉल कंपाउंड करण्याचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणची अतिक्रमणे हटवून जागा ताब्यात घेताना अडचणी येतात. ही प्रक्रिया वेगाने सुरू आहे. उत्पन्नवाढीच्या दृष्टीने मोकळ्या जागांवरून एसटीची मालवाहतूक सेवा सुरू करण्याचा विचार आहे. 
- दिवाकर रावते, परिवहन मंत्री 

ना नफा - ना तोटा तत्त्वावर एसटी चालवताना उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न केले जात नाहीत. उलट मोकळ्या जागा बिल्डर, कंत्राटदारांच्या घशात घालण्याचा डाव एसटीमध्ये सुरू आहे. याविरोधात संघटनेमार्फत आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येणार आहे. 
- मुकेश तिगोटे, सरचिटणीस महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेस (इंटक) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST Corporation are state Worth millions of danger spot