एसटी महामंडळाची माईल्ड स्टील बांधणीची बस धावणार

शिवचरण वावळे
रविवार, 14 मे 2017

अशी आहेत माईल्ड स्टीलची वैशिष्ट्ये...
- आताच्या बसपेक्षा ३० सेंटिमीटरने वाढविली उंची
- जुन्या बसपेक्षचा तिप्पटीने वाढविली लगेज स्पेस
- खिडक्‍यांचा वाढला आकार
- मार्ग फलक असणार एलईडीमध्ये
- प्रवाशांना सूचना देण्यासाठी चालकाजवळ असणार माईक व स्पीकर
- गाडीत हवा खेळती राहण्यासाठी छताला असणार तीन रुफ हॅच
- आणीबाणीच्या प्रसंगासाठी आलार्मची सोय
- हवेचा रोध कमी करण्यासाठी एरोडायनामिक डिझाईन

नांदेड - राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सध्या असलेल्या ऍल्युमिनिअम बांधणीतील बस ठराविक काळानंतर खिळखिळ्या होतात. यामुळे प्रवासात विशेषतः खराब रस्त्यावरून होणाऱ्या खडखडाटामुळे उद्‌भवणारी महामंडळाची अन प्रवाशांची डोकेदुखी आता थांबणार असून, ऍल्युमिनिअम बांधणीतील बस एेवजी राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात परिवर्तन श्रेणीच्या बसमध्ये आता माईल्ड स्टीलने बांधलेल्या बस लवकरच दाखल होणार आहेत असल्याचे संकेत राज्य परिवहन महामंडळाकडून देण्यात आले आहेत.

ऍल्युमिनियमपासून बांधलेल्या बस वजनाने हलक्‍या असल्या तरीही बसचा अपघात झाल्यानंतर प्रवाशांना गंभीर दुखापतीची शक्‍यता अधिक होती. बसचेही नुकसान मोठ्या प्रमाणात होत होते. या पार्श्‍वभूमीवर प्रवाशांची सुरक्षा डोळ्यासमोर ठेवून राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी या पुढे ऍल्युमिनिअम ऐवजी माईल्ड स्टीलमध्ये परिवर्तन श्रेणीतील बस बांधण्याचा निर्णय घेतला. या बसची बांधणी करत असताना सांध्यामध्ये थर्माकोलचा वापर केल्याने प्रवासात गाडीचा आवाज होणार नाही याची दक्षता घेण्यात आली असल्याचे समजते.

त्यानुसार प्रायोगिक तत्त्वावर पुण्यातील दापोडी कार्यशाळेत माईल्ड स्टीलची बस बांधण्यात आली आहे. सुखकर प्रवास व प्रवाशांची सुरक्षितता या अनुषंगाने या बसमध्ये अनेक बदल केले जात आहेत. कर्नाटक व आंध्र प्रदेशातील परिवहन महामंडळाच्या आरामदायी प्रवासाचा महाराष्ट्रातील प्रवाशांना नेहमीच हेवा वाटत आहे. त्याच धर्तीवर आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची परिवर्तन बस ही होणार असून येत्या काळात एसटीचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर प्रवास होणार, हे निश्‍चित.

अशी आहेत माईल्ड स्टीलची वैशिष्ट्ये...
- आताच्या बसपेक्षा ३० सेंटिमीटरने वाढविली उंची
- जुन्या बसपेक्षचा तिप्पटीने वाढविली लगेज स्पेस
- खिडक्‍यांचा वाढला आकार
- मार्ग फलक असणार एलईडीमध्ये
- प्रवाशांना सूचना देण्यासाठी चालकाजवळ असणार माईक व स्पीकर
- गाडीत हवा खेळती राहण्यासाठी छताला असणार तीन रुफ हॅच
- आणीबाणीच्या प्रसंगासाठी आलार्मची सोय
- हवेचा रोध कमी करण्यासाठी एरोडायनामिक डिझाईन

Web Title: ST Corporation will run the Miled steel construction bus