एसटीचालकाने चक्क भावाचा मृतदेहच सुट्टीसाठी बसस्थानकात आणला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मे 2019

तेजराव सोनवणे यांना खरेच सुटी दिली नाही का, याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांकडे विचारपूस केली. मुळात चालकांची संख्या अधिक असल्याने सुटी रोखण्याचे कारण नाही. सोनवणे हे त्यांची बॅग व अन्य साहित्य घेण्यासाठी आले होते. त्यांची सुटीही मंजूर केलेली आहे. त्यामुळे ते ड्युटीवर आल्यानंतरच खऱ्या प्रकाराची माहिती घेण्यात येईल.
- अमोल भुसारी, आगार व्यवस्थापक

औरंगाबाद - एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या सुट्यांवर नेहमीच प्रश्‍नचिन्ह असतात, वरिष्ठ अधिकारी सुटीच्या कारणांवर शंका घेतात. म्हणून एका एसटीचालकाने चक्क भावाचा मृतदेहच मंगळवारी (ता. १४) सिडको बसस्थानकात आणला. या प्रकाराने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. 

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना सुट्या देताना वरिष्ठ अधिकारी कायमच नकारात्मक भूमिका घेतात. अनेकवेळा तर सुटीचे कारण हे चुकीचे असल्याचे सांगून खोटे बोलण्याचा आरोप लावतात. सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने कर्मचाऱ्यांना सहज सुटी मिळत नाही. कदाचित याच कारणामुळे एसटीचे चालक तेजराव सोनवणे यांनी भावाचा मृतदेह असलेली शववाहिनी थेट बसस्थानकात आणल्याची चर्चा आहे. सोनवणे यांच्या भावाचे रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले, त्यानंतर पुन्हा शंका उपस्थित होऊ नये म्हणून ते गावी जाण्यापूर्वी मंगळवारी सकाळी थेट ॲम्ब्युलन्स घेऊन आल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली. असे असले तरीही सोनवणे हे त्यांची बॅग घेण्यासाठी आले होते, त्यांची मंगळवारी साप्ताहिक सुटी होती. त्यांनी पाठवलेला रजेचा अर्जही मंजूर केल्याचे अधिकारी सांगत आहेत.

Web Title: ST Driver Leave Brother Deathbody Busstop