चिठ्ठीनेच केले स्थायी समिती ‘सभापतीं’ना आऊट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

लातूर - गेल्यावर्षी महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदी काँग्रेसचे अशोक गोविंदपूरकर यांची चिठ्ठीने निवड झाली होती. यंदा या चिठ्ठीनेच श्री. गोविंदपूरकर यांचा घात केला आहे. त्यांच्यासोबतच काँग्रेसचे पाच, भाजपचे दोन व राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकांच्या नावाचीही चिठ्ठी निघाली.

लातूर - गेल्यावर्षी महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदी काँग्रेसचे अशोक गोविंदपूरकर यांची चिठ्ठीने निवड झाली होती. यंदा या चिठ्ठीनेच श्री. गोविंदपूरकर यांचा घात केला आहे. त्यांच्यासोबतच काँग्रेसचे पाच, भाजपचे दोन व राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकांच्या नावाचीही चिठ्ठी निघाली.

स्थायी समितीच्या सदस्यांची ता. एक मे रोजी मुदत संपली आहे. या समितीत १६ सदस्य आहेत. कायद्यानुसार यापैकी आठ सदस्यांना चिठ्ठी टाकून निवृत्त करण्यात आले. या करिता महापालिकेत बुधवारी (ता. दोन) आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. स्थायी समितीच्या हातीच महापालिकेच्या आर्थिक नाड्या असतात. या समितीत भाजपचे आठ, काँग्रेसचे सात व राष्ट्रवादी काँग्रेसचा एक असे १६ सदस्य आहेत.

या बैठकीत १६ सदस्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या ठेवण्यात आल्या होत्या. चार लहान मुलांना एक-एक अशी चिठ्ठी काढण्यास लावण्यात आली. यात काँग्रेसचे अशोक गोविंदपूरकर, रविशंकर जाधव, विक्रांत गोजमगुंडे, अहमदखाँ पठाण, सचिन बंडापल्ले, भाजपचे शैलेश स्वामी व शीतल मालू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राजा मणियार यांच्या नावाची चिठ्ठी निघाली. दरम्यान, लातूर-उस्मानाबाद व बीड या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर नवीन आठ सदस्य समितीत येणार आहेत.

पुन्हा चिठ्ठीच ठरवणार किंगमेकर
महापालिकेच्या स्थायी समितीत भाजपचे आठ, काँग्रेसचे सात व राष्ट्रवादी काँग्रेसचा एक सदस्य आहे. निवृत्तीमुळे या समितीत नव्याने काँग्रेसचे सहा, भाजपचे दोन व राष्ट्रवादी काँग्रेसचा एक सदस्य येणार आहे. सध्या लातूर, बीड व उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. ही आचारसंहिता संपल्यानंतर सर्वसाधारण सभा होईल. या सभेत संबंधित पक्षाचे गटनेते नवीन सदस्यांची नावे देतील. त्यांचा या समितीत समावेश करण्यात येणार आहे. त्यानंतर सभापतीची निवड केली जाणार आहे. सत्ताधारी व विरोधकांचे समान सदस्य असल्याने गेल्यावर्षीसारखी चिठ्ठीनेच सभापतींची निवड होणार आहे.

Web Title: standing committee member selection politics