SBI चा 'गजब' कारभार! तब्बल 54 हजार रुपये खात्यादाराच्या परस्पर बिहार सरकारच्या खात्यावर

प्रविण फुटके
Monday, 18 January 2021

टोकवाडी येथील रहिवासी लक्ष्मण मुंडे यांचे अनेक वर्षांपासून राणी लक्ष्मीबाई टाँवर चौकातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत खाते आहे

परळी वैजनाथ (जि.बीड) : तालुक्यातील टोकवाडी येथील रहिवासी लक्ष्मण मुंडे यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे गहाळ कारभारामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मुंडे यांच्या बँकेच्या खात्यातून कोणताही ओटीपी न येता, आँनलाईन ट्रानजक्शन न करता तब्बल ५४ हजार रुपये कमी झाले आहेत.

हे पैसे बिहार राज्य सरकारच्या एका विभागाच्या खात्यात २१ डिसेंबरला वर्ग झाले आहेत. याबाबतची तक्रार बँकेच्या शाखेत देऊनही शाखाधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आणखीनही पैसे खात्यात जमा झाले नाहीत. याचा त्रास मात्र खातेदारास सहन करावा लागत आहे. 

नळदुर्ग किल्ला पर्यटकांसाठी सज्ज;दीर्घ प्रतीक्षेनंतर किल्ला खुला

टोकवाडी येथील रहिवासी लक्ष्मण मुंडे यांचे अनेक वर्षांपासून राणी लक्ष्मीबाई टाँवर चौकातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत खाते आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या खात्यातून व्यवहार केला जातो. २१ डिसेंबरला रात्री अचानक श्री. मुंडे यांच्या खात्यातून तीन वेळा पैसे कपात झाले. सुरुवातीला ३९ हजार ६०५, २३००,२३००,६३५० असे पैसे कपात झाल्यानंतर ११४० रुपये ट्रान्जंक्शन चार्ज ही कपात करण्यात आला.

मुंडे यांच्या खात्यातून तब्बल ५४ हजार रुपये कमी झाले आहेत. २२ डिसेंबरला यासंदर्भात बँकेत येवून चौकशी केली असता बिहार राज्य सरकारच्या एका विभागाच्या खात्यात हे पैसे जमा झाल्याचे शाखाधिकारी यांनी सांगितले. त्यामुळे तक्रार देण्यात आली. शाखाधिकारी अनंत नाग यांनी एकदोन दिवसात तुमचे पैसे परत मिळतील असे सांगितले पण २६ दिवस झाले तरी पैसे खात्यात जमा झाले नाहीत.

'ये तो किस्मत है भाई...' पोटाची खळगी भरण्यासाठी स्मशानातील राखेतुन सोनं शोधण्याची धडपड

शाखाधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे हे पैसे आणखीनही परत मिळाले नाहीत. यासंदर्भात लक्ष्मण मुंडे यांनी सांगितले की, आम्ही आमच्या खात्यात पैसे जमा ठेवले म्हणून आमचा गुन्हा झाला का, आम्ही खात्यात पैसे ठेवावेत का नाही? बँक आमच्याकडे कर्ज असल्यास एक दिवस झाला की, व्याज लावते. मला जेवढे दिवस पैसे खात्यात जमा होण्यासाठी लागतील तेवढ्या दिवसाचे व्याज मिळणे आवश्यक आहे.

तसेच मुंडे पुढे बोलताना म्हणाले की, मी कोणताही ऑनलाईन व्यवहार केला नाही. मला ओटीपी आला नाही मग परस्पर पैसे खात्यातून कमी कसे झाले? मी यासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. ते पण यासंदर्भात काहीच करत नाहीत सामान्य माणसाने नेमका न्याय कोणाकडे मागायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. माझे पैसे लवकरात लवकर खात्यात जमा करावेत अन्यथा बँकेसमोर उपोषण करणार असल्याचे श्री.मुंडे यांनी यावेळी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State bank of india bad management 54 thousand deduct without permission Bihar government