राज्य कर्करोग संस्थेच्या बांधकामाची निघाली निविदा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद -"जन्माआधी बारशाची घाई' या मथळ्याखाली "सकाळ'ने प्रशासकीय मान्यतेशिवाय 11 फेब्रुवारी 2018 ला उरकलेल्या भूमिपूजनाला उजेडात आणले होते. त्यानंतर राज्य कर्करोग संस्थेच्या बांधकामाला गती देण्यासाठी "सकाळने सातत्याने पाठपुरावा करत वार्तांकन केल्याची वेळोवेळी दखल घेतली गेली. त्यामुळे आचारसंहितेत हे बांधकाम अडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर शासकीय कर्करोग रुग्णालयाच्या किरणोपचार विभागाच्या 33.13 कोटींच्या उभ्या विस्तारीकरण बांधकामाला गती मिळणार असून, त्यासाठी भूमिपूजनाच्या तब्बल 19 महिन्यांनी एसएससीसीने निविदा प्रसिद्ध केली आहे.

राज्य कर्करोग संस्थेच्या बांधकामासाठी नोव्हेंबर 2018 मध्ये एसएससीसी कंपनीला नियुक्त केल्या गेले. संस्थेने सुधारित डीपीआर बनविल्यावर राज्य शासनाने 14 ऑगस्टला 38.75 कोटींच्या बांधकाम अंदाजपत्रकाला मान्यता दिली होती. पहिला डीपीआर 77 कोटींवर पोचला होता. त्यानंतर निधीचा मेळ घालत डीपीआरमध्ये केवळ अत्यावश्‍यक बाबींचा समावेश करून तो 38.75 कोटींचा करण्यात आला. त्यांनतर निविदा प्रक्रिया आचारसंहितेत अडकणार नाही याची दक्षता कर्करोग रुग्णालयाचे सल्लागार डॉ. कैलास शर्मा यांनी घेत पाठपुरावा केल्याने अखेर निविदा प्रसिद्ध झाली आहे. पुढील महिनाभरात निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कार्यादेश निघण्याची शक्‍यता आहे. हे विस्तारीकरण 15 महिन्यांत करण्याचे निविदेत म्हटले आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने 235 खाटांची सुविधा निर्मिती होण्यास 2021 उजेडणार आहे. अद्याप, विस्तारीकरणासाठी आवश्‍यक मनुष्यबळाची प्रतीक्षाही कायम आहे. 

अशी होईल उभारणी 
विस्तारीकरणात तळमजल्यावर लिनॅक, ब्रेकीथेरपी बकरसह बाह्यरुग्ण विभाग, कर्मचाऱ्यांसाठी कक्ष, मायनर ओटी, त्यानंतर पहिल्या मजल्यावर 42 खाटांचा वॉर्ड, दुसऱ्या मजल्यावर दोन वॉर्ड होतील. सध्याच्या इमारतीवर एक मजल्याचे बांधकाम होईल. या मजल्यावर आठ आयसोलेशन कक्ष, 16 खाटांचे एमआयसीयू, 15 खाटांचे पेइंग रूम, डॉक्‍टरांसाठी कक्षाचे डीपीआरमध्ये प्रस्तावित आहे. 

अशी आहे वाटचाल 

  • -20 सप्टेंबर 2012 ला शासकीय कर्करोग रुग्णालयाची मुहूर्तमेढ 
  • -3 जून 2015 ला टाटा इन्स्टिट्यूटसोबत टायअप 
  • -पाच वर्षांत कामगिरी उंचावली 
  • -15 ऑक्‍टोबर 2016 ला राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा 
  • -केंद्राच्या एनपीसीडीसीएस योजनेतून 96.70 कोटींचा प्रकल्प 
  • -केंद्राचा 60 तर राज्य शासनाचा 40 टक्के हिस्सा 
  • -11 फेब्रुवारी 2018 ला झाले भूमिपूजन 
  • -31.07 कोटींच्या बांधकामाला मे 2018 मध्ये मान्यता 
  • -165 वाढीव खाटांचे विस्तारीकरण 
  • -रेडिओथेरपी विभागाच्या दुसऱ्या युनिटचा विस्तार 
  • -लिनॅक व ब्रेकीथेरपी बंकरचे बांधकाम. त्यावर दोन मजले. 
  • -सध्याच्या रुग्णालय इमारतीवर एक मजला 
  • -14 ऑगस्टला 38.75 कोटींच्या बांधकामाच्या डीपीआरला मान्यता 
  • -निविदा प्रक्रियेनंतर बांधकामाला 15 महिन्यांची मुदत 
  • -24 सप्टेंबरला प्री-बीड मीटिंग 
  • -सात ऑक्‍टोबरला दुपारी तीन वाजता दिल्लीत उघडणार निविदा 
     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com