केंद्राने घाटीला दिलेली अतिविशेषोपचार सेवा राज्याने अडवली

superspeciality wing Gmch Aurangabad
superspeciality wing Gmch Aurangabad

औरंगाबाद : अद्ययावत अतिविशेषोपचारांसाठी राज्यात घाटी रुग्णालयासह चार ठिकाणी उभारण्यात आलेल्या सुपरस्पेशालिटी विंग डिसेंबरअखेर सुरू करण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेचे संचालक जितेंद्र अरोरा यांनी 19 नोव्हेंबरला वैद्यकीय शिक्षण सचिवांना दिल्या; मात्र घाटीतील सुपरस्पेशालिटी विंगच्या रखडलेल्या पाणी व वीजजोडणीसाठी आणखी तीन महिन्यांचा कालावधी आणि मनुष्यबळाची मान्यता मिळेपर्यंत उद्‌घाटन शक्‍य होणार नसल्याचे घाटीकडून कळवण्यात आले आहे.

केंद्राच्या पीएमएसएसवाय फेज-तीनमधून अकोला, लातूर, औरंगाबाद (घाटी) व यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत दीडशे कोटी रुपयांची 248 खाटांची स्वतंत्र सुपरस्पेशालिटी विंग उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. बांधकामासह डिसेंबर 2017 अखेरीस या इमारती पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र घाटीतील सुपरस्पेशालिटी विंगला अद्यापही वीज आणि पाण्याची जोडणी मिळू शकली नाही. त्यामुळे विंग रुग्णसेवेत दाखल होऊ शकली नाही.

घाटीतील इमारतीसाठी दीडशे कोटींपैकी बांधकामासाठी 86.73 कोटींचा तर यंत्रसामग्रीसाठी 63.27 कोटी निधी मंजूर करण्यात आला होता. आतापर्यंत बांधकामावर जवळपास 54 कोटी रुपये खर्च केल्याचा दावा बांधकाम करणाऱ्या केंद्राच्या अंगिकृत संस्था असलेल्या एसएससीसीकडून करण्यात आला आहे. निधीच्या विनियोगावरून 80 टक्के काम झाल्याचे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांचे म्हणणे आहे. बांधकाम कंत्राटदार 90 टक्के काम पूर्ण असल्याचा दावा करत आहेत. केवळ यंत्रासाठी असलेल्या 49 पैकी 26 कोटींची यंत्रखरेदी झाल्याचा दावाही एचएलएल ही केंद्राची अंगिकृत संस्था करीत आहे. पाचमजली इमारतीत सेंट्रलाइज एसी, सेंट्रल ऑक्‍सिजनसह इतर गॅस पाइपलाइनची व्यवस्था आहे. निर्जंतुकीकरण, एमआरआय, कॅथलॅब, गॅस पाइपलाइन असे पाच प्रकल्प टर्न-की प्रकल्प असून, त्यापैकी 30 टक्केच काम झाले आहे. 

दोन वर्षांपासून पदमान्यता रखडली 
नोव्हेंबर 2017 पासून पदमान्यतेसाठी अनेकदा सुधारित प्रस्तावात पाठवण्यात आला. आता सध्या तीन टप्प्यांत 1,148 पदनिर्मितीचा प्रस्ताव तयार करण्यात आहे. यात पहिल्या टप्प्यातील 465 पदांचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव हायपॉवर कमिटीकडे असून, अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. 

वीजजोडणीला दोन महिने लागणार 
घाटी परिसरात उभ्या राहिलेल्या या स्वतंत्र ब्लॉकसाठी सबस्टेशनची गरज आहे. त्यासाठी दोन कोटी 35 लाखांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली. त्याचा कार्यारंभ आदेशदेखील निघाला आहे; मात्र अद्याप निधी बीडीएसवर अजूनतरी उपलब्ध झालेला नाही. हा निधी लवकरच उपलब्ध होईल व सबस्टेशनचे काम सुरू होईल. सबस्टेशनचे काम पूर्ण होण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे घाटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

तीन व्हिडिओ कॉन्फरन्स 
केंद्रीय कुटुंबकल्याण व आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी राज्यातील अकोला, लातूर, यवतमाळ, औरंगाबाद येथील प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी 28 मे, 20 जून व 29 ऑगस्ट अशा तीन व्हिडिओ कॉन्फरन्स घेत विधानसभेपूर्वी उद्‌घाटनाची घाई करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र राज्य शासनाने लक्ष न दिल्याने चारही उद्‌घाटने रेंगाळली. 

कराराची दिली आठवण 
औरंगाबाद आणि लातूरच्या वीज आणि पाणीजोडणीचा प्रश्‍न अतिमहत्त्वाचा प्रश्‍न म्हणून सोडवा. इमारतीच्या बांधकाम व प्रगतीत येणारे व्यत्यय संबंधित प्रशासनाने दूर करावेत. मनुष्यबळाचा प्रश्‍न राज्य शासनाने आणि संबंधित संस्थेने हाताळावा. लवकर इमारत ताब्यात घ्या. त्यातील साधनसामग्री सुरू करून त्याचेही हस्तांतरण जलदगतीने करा, असे एमओयूमध्ये नमूद असल्याचे सांगत यवतमाळ मार्च 2020, तर घाटीसह लातूर, अकोला या तीनही विंग डिसेंबरअखेर सुरू करण्याची व उद्‌घाटनाची तयारी करण्याचे पीएमएसएसवायने दिलेल्या पत्रात म्हटले आहे. 

या मिळतील सुविधा 
न्यूरोसर्जरी, न्यूरोलॉजी, कार्डियालॉजी, नेफ्रोलॉजी, युरोलॉजी, बर्न, प्लॅस्टिक सर्जरी, न्यूओनेटॉलॉजी या आठ प्रकारच्या सेवा या इमारतीत दिल्या जाणार आहेत. पाचमजली इमारतीत तळमजल्यावर आपत्कालीन सेवा, 18 डायलिसिस बेड, एमआरआय, पहिल्या मजल्यावर आठ अतिविशेषोपचार बाह्यरुग्ण विभाग, दुसऱ्या मजल्यावर चार वॉर्ड त्यात आयसीयूच्या धर्तीवर 84 बेडची व्यवस्था, तिसऱ्या मजल्यावर चार वॉर्ड त्यात आयसीयूच्या धर्तीवर 84 बेडची व्यवस्था, तीस खाटांचे एनआयसीयू, चौथ्या मजल्यावर प्रत्येकी 12 बेडचे 4 अत्याधुनिक आयसीयू, तर पाचव्या मजल्यावर सहा अत्याधुनिक मॉड्युलर ओटी, कॅथलॅब अशी व्यवस्था या इमारतीत करण्यात आली आहे.

डिसेंबरअखेर सुपरस्पेशालिटी विंग उद्‌घाटनाची तयारी ठेवण्याच्या सूचना केंद्र शासनाकडून मिळाल्या; मात्र पाणी आणि वीजजोडणी अद्याप बाकी आहे. सबस्टेशनच्या कामाला विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दोन महिने लागतील, असे आम्हाला लेखी कळवले आहे. त्यानंतर यंत्रसामग्री इन्स्टॉलेशनला किमान एक महिना असे तीन महिने लागतील. शिवाय पदमान्यतेसाठीही पाठपुरावा सुरू आहे. तसे डीएमईआर संचालक, वैद्यकीय शिक्षण सचिव, पीएमएसएसवाय संचालकांना पत्राद्वारे कळवले आहे. 
- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com